Sunday, January 29, 2017

ज्ञानी, अज्ञानी आणि कार्म | Wise, Unwise and Action


ज्ञानी पुरुष कर्म करूनही कर्तृत्व-भोक्तृत्वरहित असतो.  कर्मफलासक्तिरहित असतो.  सिद्धि-असिद्धी, यश-अपयश, लाभ-हानि या सर्वांच्यामध्ये तो हर्षविषादरहित असतो.  कोणत्याही प्रसंगाने तो विचलित, व्याकूळ होत नाही.  संसारामध्ये असूनही त्यापासून अलिप्त असतो.  याउलट, अज्ञानी पुरुषामध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व यांचा अभिमान असतो.  तसेच  कर्मफलासक्ति असल्यामुळे कितीही मिळाले तरी त्यामध्ये त्याला कधीच समाधान नसते. तो अतृप्तच असतो.  

अज्ञानी मनुष्य कर्मफळामध्ये आसक्त असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही किंवा अपेक्षेविरुद्ध घडले तर ते निराश होतात, खचून जातात.  त्यांच्या मनाचे संतुलन ढळते.  याउलट, ज्ञानी पुरुष कर्मफलासक्त नसल्यामुळे काय घडावे व काय घडू नये हे स्वतः न ठरविता जो जो प्रसंग येईल तो आनंदाने स्वीकार करतात.  त्यामुळे कोणत्याही प्रसंगामध्ये त्यांचे धैर्य, आत्मविश्वास खचत नाही.  संकटकाळामध्येही त्यांची वृत्ति समतोल राहाते.  ते कधीही निराश, उद्विग्न होत नसून सतत उत्साही, आनंदी आणि प्रसन्न असतात.  निंदा, नालस्ती, अपमान झाला तरीसुद्धा ते शांत राहातात.  शठं प्रति शाठ्यम् | - जशास तसे.  अशा प्रकारचा विचारही त्यांच्या मनात येत नाही.  उलट त्यांची कोणी स्तुति करो किंवा निंदा करो, ते कधीही हुरळून जात नाहीत अथवा निराश होत नाहीत.  स्वकर्तव्यपराङ्मुखही होत नाहीत.  

याप्रकारे त्यांचे आचरण पाहून आपोआपच अन्य अज्ञानी लोक सुद्धा त्याप्रमाणे त्यांच्या आचार-विचार-उच्चारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.  आत्मज्ञानी पुरुष अज्ञानी लोकांच्या जीवनाला निश्चित स्वरूपाची दिशा देवून त्यांचे जीवन उदात्त, श्रेष्ठ, त्यागमय करण्यासाठी साहाय्यकारी होतात.  त्यांचे बहिर्मुख मन अंतर्मुख करून त्यांच्याकडून क्रमाक्रमाने आत्मपरीक्षण आणि शास्त्रश्रवणमननादि साधना करवून घेवून चिरंतन आनंदाचा-मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवितात.  त्यांचे जीवन पूर्ण करतात.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, January 24, 2017

भगवान कार्मानुष्ठान सांगतात | God Advocates Action


मी कर्म करण्यामध्येच मानवजातीचे कल्याण आहे.
लोकेSस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ |

सत्त्वगुणी, सदाचारी, विवेकी, चिंतनशील लोक फारच थोडे आहेत. याउलट, रजोगुण आणि तमोगुणप्रधान अधिक आहेत. अशा लोकांना – संन्यस्य श्रवणं कुर्यात् | या न्यायाने सर्वकर्मसन्यास करून शास्त्रश्रवण करण्याचा आदेश दिला तर त्यांचा महाभयंकर विनाश होईल. त्यांचे अधःपतन होईल, कारण ते जरी साधक असतील तरीही ज्ञानाचे अधिकारी नाहीत.

मनाची पक्वता नसताना किंवा अधिकारी नसताना त्यांनी कर्मत्याग करून शास्त्राभ्यास केला तर तो कर्मत्याग त्यांना निश्चितच फलदायी ठरणार नाही. म्हणून हे सर्व मंद-मध्यम साधक कर्मसंन्यासाचे अधिकारी नसून कर्माचेच अधिकारी आहेत. त्यांना कार्मानुष्ठान हेच उत्कर्षाचे तसेच चित्तशुद्धीचे साधन आहे, हे शिकविण्यासाठीच मला कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.

अवतारकार्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा संघर्ष, विरोध, प्रतिकूल परिस्थिति आली तरी सुद्धा मी कधीही सदाचार आणि धर्माचरण सोडीत नाही. उलट, कर्मयोग हाच उन्नतीचा मार्ग आहे, हे दाखविण्यासाठी तसेच लोकसंग्रह आणि लोकहितासाठी मी अविश्रांतपणे कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो.

मी स्वतः या जीवांच्या रूपाने जन्माला आलेलो असल्यामुळे माझ्यापासून दूर गेलेल्या माझ्या प्रजेला भावसागरामधून बाहेर काढून त्यांना पुन्हा आत्मस्वरूपाची शांति आणि आनंद देणे हे माझे परमकर्तव्य आहे. म्हणून, हे अर्जुना ! मी अविश्रांत कर्मरत असतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, January 17, 2017

ज्ञानयोग | Path of Knowledge



ज्ञानं एव योगः ज्ञानयोगः |  ज्ञान हाच योग आहे.  योग हा शब्द ‘युज’ धातुपासून बनलेला आहे. युज म्हणजे जोडणे.  या अर्थाने ज्ञान हेच जीवाला ईश्वराशी जोडणारे साधन आहे.  नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जावयाचे असेल तर सेतु या साधनाची आवश्यकता असते.  याठिकाणी सुद्धा जीव हा एका अवस्थेला असून त्याला अज्ञानरूपी भवसागरामधून पार करून मोक्षावस्थेला न्यावयाचे आहे.  त्यासाठी त्याला सेतुप्रमाणे साधनाची आवश्यकता आहे की, जे साधन त्याला मोक्षावस्थेपर्यंत घेवून जाईल.  संसार हा अज्ञानकल्पित असल्यामुळे संसाराला पार करून मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान हेच साधन आहे.  तोच ज्ञानयोग होय.

हा मार्ग कोणाला सांगितला?
सांख्य म्हणजे ज्यांनी आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक करून त्या दोघांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त केलेले आहे, असे विवेकी साधक आहेत.  जे वेदांतशास्त्रामधून प्रतिपादित केलेल्या निर्विशेष परब्रह्माचे स्वरूप आत्मानात्मविचाराने समजावून घेवून ते परब्रह्म प्रत्यगात्मस्वरूपाने जाणतात ते ब्रह्मज्ञानी म्हणजेच सांख्य होत.  ते ब्रहमज्ञानी केव्हा होतात ?  तर – ब्रह्मचर्याश्रमादेव कृतसंन्यासानाम |  

ते सत आणि असत वस्तूचे स्वरूप समजावून घेवून असतचा त्याग करून सत वस्तूचा आश्रय घेतात.  असत वस्तूचा त्याग म्हणजेच सर्व ऐहिक इंद्रियांच्या उपभोगांचा त्याग करून विषयभोगात न अडकता ब्रह्मचर्याश्रमातून एकदम सर्व कर्मांचा संन्यास घेतात अशा साधनचतुष्टयसंपन्न असलेल्या साधकांना ब्रह्मस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त करण्यासाठी ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे.  हे सर्व विश्व आणि मी ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारच्या ब्रह्माकारवृत्तीने स्वस्वरुपाची निश्चल स्थिति प्राप्त होते.  तोच योग होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


            - हरी ॐ –    

Tuesday, January 10, 2017

प्रकृतीच्या गुणांचे स्वरूप | Characteristics of Natural Tendencies



तीन गुणांचे धर्म शास्त्रकार सांगतात –
प्रज्ञां तु सात्त्विकीं प्राहुस्तामसीं तु विचित्तताम् |
क्रियां तु राजसीं प्राहुर्गुणतत्त्वविदो बुधाः ||

प्रकृतीच्या गुणांचे स्वरूप जाणणारे विद्वान सांगतात – प्रज्ञा म्हणजे ज्ञान हा सत्त्वगुणाचा धर्म आहे.  चित्तभ्रष्ट करणे म्हणजेच चित्त मोहीत करणे हा तमोगुणाचा धर्म आहे आणि कर्म हे राजोगुणाचे स्वरूप आहे.

प्रकृतीच्या तीन गुणांपैकी कोणताही एक गुण ज्यावेळी व्यक्त होतो त्यावेळी त्या गुणानुरूप विशिष्ट प्रकारच्या वृत्ति अंतःकरणात निर्माण होतात.  सत्त्वगुण ज्यावेळी प्रधान होतो त्यावेळी अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध होते, कारण शुद्धता हा सत्त्वाचा धर्म आहे.  त्यावेळी मनाची एकाग्रता होते आणि ज्ञानप्राप्ति होते.  तसेच श्रेष्ठ गुणांचा किंवा दैवीगुणसंपत्तीचा आणि विवेक-वैराग्यादि गुणांचा उत्कर्ष होतो.

तमोगुण प्रधान झाला की, तो सदसद्विवेकबुद्धीवर आवरण घालतो आणि विवेकाचा नाश होऊन अविवेक किंवा अविचार निर्माण होतो.  त्यामधून मोह, प्रमाद, निद्रा वगैरेदि दोष निर्माण होतात.  त्यावेळी कोणत्याही विषयाचे स्पष्ट ज्ञान होत नाही.  याउलट रजोगुणामुळे काम-क्रोधादि विकार निर्माण होवून मन अशांत, अस्वस्थ, विक्षेपयुक्त होते.  या चंचल मनाने कोणतेही ज्ञान निःसंशय प्राप्त होत नाही आणि जर झाले तर विपरीत ज्ञान होते.

थोडक्यात तमोगुणामुळे विषयाचे अग्रहण होते.  रजोगुणामुळे विपरीत ग्रहण किंवा अन्यथा ग्रहण होते आणि सत्त्वगुणामुळे निःसंशय यथार्थ ज्ञान प्राप्त होते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, January 3, 2017

समर्पण कर्म | Dedicated Action


कर्म अर्पण करीत असताना दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.
१). परमेश्वराच्या सत्तेची जाणीव झाली पाहिजे.  तो कर्तुं-अकर्तुं आहे.  तसेच तो सर्व विश्वाचा नियामक असून माझ्या जीवनाचाही नियामक आहे.  त्याच्या इच्छेनेच सर्व काही घडत असून माझ्या जीवनाला दिशा देवून घडविणारा तोच विश्वनियंता आहे.  त्याच्यापासून मी स्वतंत्र नाही.  तर तो आहे म्हणून मी आहे.  यामुळे तोच या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे.
२). प्रत्येक कर्म मी करीत नसून माझ्यामधून परमेश्वरच करतो.  तो माझ्याकडून करवून घेतो.  यामुळे तो सर्व कर्मांचा नियामक आहे.  त्याच्या केवळ संनिधमात्राने सर्व कर्म घडत असते.  झाडाचे पानही त्याच्याच सत्तेने हलते.  म्हणून तो कर्माध्यक्ष आहे.

भगवान म्हणतात –
उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः |
परमात्मेति चाप्युक्तः देहेSस्मिन्पुरुषः परः || (गीता अ. १३ - २२)
पुरुष या देहामध्ये स्थित असून मायातीत आहे.  तो साक्षी आणि अनुमति देणारा असून सर्वांना धारण करणारा, जीवरूपाने भोक्ता आणि सर्व देवांचाही देव असल्यामुळे महेश्वर तसेच शुद्ध सच्चिदानंदस्वरूप असल्याने त्याला परमात्मा असे म्हटले जाते.  प्रत्येक कर्माचे फळ तोच देत असल्यामुळे त्याला ‘कर्मफलदाता’ असे म्हणतात.

याप्रकारे परमेश्वराचे स्वरूप जेव्हा बुद्धीला पटते, उमजते त्याचवेळी अध्यात्मबुद्धीचा म्हणजेच विवेकबुद्धीचा उदय होतो आणि मनुष्याचा अहंकार समर्पण होतो.  तो नम्र होतो.  त्यावेळी त्याच्या मनात ईश्वरार्पणबुद्धि निर्माण होते.  ज्याला आपण अर्पण करतो त्याच्यावर नितांत श्रद्धा, भक्ति, प्रेम असेल तरच सेवाभाव निर्माण होतो.  त्यामुळे समर्पण हे प्रत्यक्ष इंद्रियांना दिसणारे कर्म नाही, तर तो कार्मामागे असलेला शुद्ध, सात्विक, उदात्त भाव आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ