तीन
गुणांचे धर्म शास्त्रकार सांगतात –
प्रज्ञां
तु सात्त्विकीं प्राहुस्तामसीं तु विचित्तताम् |
क्रियां
तु राजसीं प्राहुर्गुणतत्त्वविदो बुधाः ||
प्रकृतीच्या
गुणांचे स्वरूप जाणणारे विद्वान सांगतात – प्रज्ञा म्हणजे ज्ञान हा
सत्त्वगुणाचा धर्म आहे. चित्तभ्रष्ट करणे
म्हणजेच चित्त मोहीत करणे हा तमोगुणाचा धर्म आहे आणि कर्म हे राजोगुणाचे स्वरूप
आहे.
प्रकृतीच्या
तीन गुणांपैकी कोणताही एक गुण ज्यावेळी व्यक्त होतो त्यावेळी त्या गुणानुरूप
विशिष्ट प्रकारच्या वृत्ति अंतःकरणात निर्माण होतात. सत्त्वगुण ज्यावेळी प्रधान होतो त्यावेळी
अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध होते, कारण शुद्धता हा सत्त्वाचा धर्म आहे. त्यावेळी मनाची एकाग्रता होते आणि ज्ञानप्राप्ति
होते. तसेच श्रेष्ठ गुणांचा किंवा
दैवीगुणसंपत्तीचा आणि विवेक-वैराग्यादि गुणांचा उत्कर्ष होतो.
तमोगुण
प्रधान झाला की, तो सदसद्विवेकबुद्धीवर आवरण घालतो आणि विवेकाचा नाश होऊन अविवेक
किंवा अविचार निर्माण होतो. त्यामधून मोह, प्रमाद, निद्रा वगैरेदि दोष
निर्माण होतात. त्यावेळी कोणत्याही
विषयाचे स्पष्ट ज्ञान होत नाही. याउलट
रजोगुणामुळे काम-क्रोधादि विकार निर्माण होवून मन अशांत, अस्वस्थ, विक्षेपयुक्त
होते. या चंचल मनाने कोणतेही ज्ञान
निःसंशय प्राप्त होत नाही आणि जर झाले तर विपरीत ज्ञान होते.
थोडक्यात
तमोगुणामुळे विषयाचे अग्रहण होते. रजोगुणामुळे
विपरीत ग्रहण किंवा अन्यथा ग्रहण होते आणि सत्त्वगुणामुळे निःसंशय यथार्थ ज्ञान
प्राप्त होते.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment