Sunday, January 29, 2017

ज्ञानी, अज्ञानी आणि कार्म | Wise, Unwise and Action


ज्ञानी पुरुष कर्म करूनही कर्तृत्व-भोक्तृत्वरहित असतो.  कर्मफलासक्तिरहित असतो.  सिद्धि-असिद्धी, यश-अपयश, लाभ-हानि या सर्वांच्यामध्ये तो हर्षविषादरहित असतो.  कोणत्याही प्रसंगाने तो विचलित, व्याकूळ होत नाही.  संसारामध्ये असूनही त्यापासून अलिप्त असतो.  याउलट, अज्ञानी पुरुषामध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व यांचा अभिमान असतो.  तसेच  कर्मफलासक्ति असल्यामुळे कितीही मिळाले तरी त्यामध्ये त्याला कधीच समाधान नसते. तो अतृप्तच असतो.  

अज्ञानी मनुष्य कर्मफळामध्ये आसक्त असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही किंवा अपेक्षेविरुद्ध घडले तर ते निराश होतात, खचून जातात.  त्यांच्या मनाचे संतुलन ढळते.  याउलट, ज्ञानी पुरुष कर्मफलासक्त नसल्यामुळे काय घडावे व काय घडू नये हे स्वतः न ठरविता जो जो प्रसंग येईल तो आनंदाने स्वीकार करतात.  त्यामुळे कोणत्याही प्रसंगामध्ये त्यांचे धैर्य, आत्मविश्वास खचत नाही.  संकटकाळामध्येही त्यांची वृत्ति समतोल राहाते.  ते कधीही निराश, उद्विग्न होत नसून सतत उत्साही, आनंदी आणि प्रसन्न असतात.  निंदा, नालस्ती, अपमान झाला तरीसुद्धा ते शांत राहातात.  शठं प्रति शाठ्यम् | - जशास तसे.  अशा प्रकारचा विचारही त्यांच्या मनात येत नाही.  उलट त्यांची कोणी स्तुति करो किंवा निंदा करो, ते कधीही हुरळून जात नाहीत अथवा निराश होत नाहीत.  स्वकर्तव्यपराङ्मुखही होत नाहीत.  

याप्रकारे त्यांचे आचरण पाहून आपोआपच अन्य अज्ञानी लोक सुद्धा त्याप्रमाणे त्यांच्या आचार-विचार-उच्चारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.  आत्मज्ञानी पुरुष अज्ञानी लोकांच्या जीवनाला निश्चित स्वरूपाची दिशा देवून त्यांचे जीवन उदात्त, श्रेष्ठ, त्यागमय करण्यासाठी साहाय्यकारी होतात.  त्यांचे बहिर्मुख मन अंतर्मुख करून त्यांच्याकडून क्रमाक्रमाने आत्मपरीक्षण आणि शास्त्रश्रवणमननादि साधना करवून घेवून चिरंतन आनंदाचा-मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवितात.  त्यांचे जीवन पूर्ण करतात.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment