जन्माला
आल्यानंतर मनुष्य हे विश्व पाहतो. विश्वामधील
दृश्य विषयांना पाहतो. मी प्रत्यक्ष
माझ्या डोळ्यांनी पाहिले, असे मी म्हणतो आणि जे डोळ्यांनी पाहतो त्यालाच मी सत्य
मानतो. येथेच आपल्या हातून चूक झालेली
आहे.
प्रत्येक
मनुष्यामध्ये असलेल्या श्रद्धेमुळेच तो सर्व ठिकाणी विश्वास ठेवत जातो. अनंत
विषयांच्यावर विश्वास ठेवला. व्यक्तींच्यावर
विश्वास ठेवला. काही वेळेस आपल्या
अपेक्षेप्रमाणे घडते. आपण ठेवलेला विश्वास
सार्थ ठरतो. परंतु पुष्कळ वेळेला
विश्वासाला तडे जातात. माणसे आपला
विश्वासघात करतात. असे अनेक आघात सोसून
सुद्धा मनुष्याला एक दुर्दम्य आशा असते. आजच्यापेक्षा
उद्याचा दिवस जरा चांगला उगवेल, मी उद्या पुन्हा जोमाने कामाला लागेन. याच श्रद्धेने मनुष्य जीवन जगतो.
विश्वामधील
आस्तिक, धार्मिक मनुष्य श्रद्धावान आहे. तसेच
नास्तिक मनुष्यही श्रद्धावान आहे. विज्ञानवादी,
बुद्धिनिष्ठ असणारा मनुष्यही श्रद्धावानच आहे. मग फरक कोठे आहे? या सर्वांच्या श्रद्धेमध्ये फरक नाही. श्रद्धा ही श्रद्धाच आहे. फक्त या सर्वांच्या श्रद्धेचे विषय भिन्न-भिन्न
आहेत. श्रद्धेचा आविष्कार भिन्न-भिन्न
आहे.
एखाद्या
मनुष्याची श्रद्धा स्वतःच्या आईवडिलांच्यावर असेल, एखाद्याची गुरूंच्यावर,
परमेश्वरावर, शास्त्रावर, ज्ञानावर, संतपरंपरेवर, संप्रदायावर असेल तर एखाद्याची
श्रद्धा पैशावर असेल, सत्तेवर असेल, एखाद्या प्रिय व्यक्तीवर असेल, काही वेळेस
मित्र-मैत्रीण-आप्त यांच्यावर असेल, काही वेळेस एखाद्याची श्रद्धा स्वतःवर,
स्वतःच्या कर्तृत्वावर असेल. त्यालाच आपण
शब्द वापरतो – आत्मविश्वास ! आत्मविश्वास
म्हणजेच स्वतःची स्वतःवर असलेली श्रद्धा होय. याप्रमाणे श्रद्धेचे विषय बदलतील. परंतु श्रद्धेचा भाव सर्वांच्यामध्ये स्थायी
आहे. सर्वांच्यामध्ये ‘श्रद्धा’ आहेच.
- "श्रद्धा
आणि अंधश्रद्धा" या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, नोव्हेंबर २०११
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment