संवित्
स्वरूप चैतन्यामध्ये नामरूपात्मक, नानात्व अनेकात्मक विश्वाचा अत्यंत अभाव असूनही
या जगताची प्रचीति कशी येते ? आणि प्रचीति
जर येत असेल तर हे विश्व चैतन्यामधून निर्माण झाले कसे ? निर्माण झाल्यानंतर चैतन्य आणि विश्व यांचा
संबंध काय ?
हे
सर्व जग चैतन्यामधून विस्तारित झालेले आहे. म्हणजेच चैतन्यामध्ये अध्यस्त, कल्पित आहे. जी अध्यस्त, कल्पित वस्तु असते तिला
अधिष्ठानाच्या सत्तेशिवाय स्वतःची सत्ता नसते. ज्याप्रमाणे तरंग, लाटा, बुडबुडे वगैरे
पाण्याच्या सत्तेने सत्तावान होऊन पाण्यामध्ये अस्तित्वात असतात किंवा बाह्य
नगरनिवासी वगैरेंचे प्रतिबिंब आरशाच्या सत्तेने सत्तावान होऊन आरशामध्ये
अस्तित्वात असते. येथे पाण्याच्या
पृष्ठभागावर प्रचीतीला येणारे अनेक तरंग, बुडबुडे या नामरूपांना त्यांची स्वतःची
सत्ता नसते तर त्यांच्यामध्ये अनुस्यूत असलेले पाणी त्यांना सत्ता देते. पाणी आहे म्हणून तरंग, बुडबुडे आहेत. परंतु
पाणी मात्र तरंग बुडबुड्याशिवाय अस्तित्वात आहे.
त्याचप्रमाणे
द्रष्टा-दृश्यात्मक भासणाऱ्या नानाविध रूपाने प्रचीतीला येणाऱ्या या द्वैतप्रपंचाला
तरंग, बुडबुड्याप्रमाणे स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून सच्चिदानन्दस्वरूप
परमात्म्याच्या सद् अंशाच्या अधिष्ठानाने
सत्तावान होऊन परमात्म्यामध्येच अस्तित्वात आहे. तसेच द्रष्ट्याला सुद्धा स्वतःची स्वतंत्र सत्ता
नसून सच्चिदानन्दस्वरूप परमात्म्याच्या अधिष्ठानाने सत्तावान होऊन
परमात्म्यामध्येच तो अस्तित्वात आहे. म्हणजेच
संवित् स्वरूप असलेले प्रत्यक् चैतन्य हेच द्रष्टा – दृश्यात्मक भासणाऱ्या प्रपंचाचे अधिष्ठान आहे. त्यामुळे सर्व विश्वाची प्रचीति संवित् स्वरूप
चैतन्यामध्ये येते.
थोडक्यात
सर्व विश्व चैतन्यामध्ये अध्यस्त, कल्पित आहे. म्हणून विश्वाला दिसणारी सत्ता ही विश्वाची
स्वतःची नसून त्याच्या अधिष्ठानाची म्हणजेच परब्रह्माचीच सत्ता आहे.
- "मनीषा
पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment