Tuesday, May 10, 2016

मन - मल आणि विक्षेप | Mind - Impurity and Distortion


मनामध्ये स्वभावतःच मल आणि विक्षेप हे दोन प्रमुख दोष आहेत.  आचार्य येथे दोन दृष्टांत देतात – जसे, आरशावर खूप धूळ साठलेली असेल, तर आरशासमोर उभे राहूनही प्रतिबिंब दिसत नाही.  त्याप्रमाणेच, अंतःकरणामध्ये रागद्वेषादि विकाररूपी धूळ, अशुद्धता असेल, तर आत्मस्वरूप प्राप्त होत नाही.  यालाच ‘मल’ असे म्हटले जाते.

आचार्य दुसरा दृष्टांत देतात – जर पाणी हलवून अस्थिर, चंचल केले तर त्या पाण्यामध्ये कधीही प्रतिबिंब दिसू शकत नाही.  याप्रमाणेच मन चंचल, अस्वस्थ, अस्थिर असेल, तर ते मन कधीही एकाग्र, तल्लीन, तन्मय होऊ शकत नाही.  मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर भरकटत राहते.  मनामध्ये भयंकर वादळे, संघर्ष निर्माण होतात.  मन सैरभैर, उच्छृंखल, विक्षिप्त होते.  एक क्षणभरही ते स्थिर, एकाग्र होत नाही.  यालाच ‘विक्षेप’ असे म्हणतात.  संत बहिणाबाई वर्णन करतात –
मन वढायं वढायं उभ्या पिकातलं ढोरं | 
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावरं ||   (संत बहिणाबाई)

या दोन दोषांच्यामुळेच आत्मस्वरूप असूनही दिसत नाही.  म्हणून ज्यावेळी ज्ञानाच्या प्रसादाने हे दोन दोष निरास होतील, मन शुद्ध व एकाग्र होईल, त्याचवेळी आत्मदर्शन शक्य आहे.  येथे ज्ञानाचा प्रसाद म्हणजेच बुद्धीचा प्रसाद होय.  श्रुति सुद्धा म्हणते –
धातुप्रसादान्महिमानमात्मनः |        (कठ. उप. १-२-२०)

साधकावर स्वतःच्या बुद्धीचीच कृपा झाली पाहिजे.  आपल्यावर गुरूंची, परमेश्वराची, शास्त्राची कृपा अखंडपणे आहेच, आपल्यावर आपलीच कृपा होणे आवश्यक आहे.  आपलेच मन या साधनेला अनुकूल झाले पाहिजे.  संत तुकाराम म्हणतात –
मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण ||  (संत तुकाराम महाराज)


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007- हरी ॐ

No comments:

Post a Comment