ब्रह्मज्ञानी पुरुषाचे सर्व संकल्प पूर्ण होतात. याचे कारण एकच, ते म्हणजे त्याचे अत्यंत शुद्ध
असणारे अंतःकरण होय. तोच
सत्यसंकल्पवान होतो. त्याच्या संकल्पाला
स्वार्थ, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार, अहंकार, ममकार या कोणत्याही विकाराचा
स्पर्श सुद्धा नसतो. म्हणूनच त्याचा
संकल्प अत्यंत स्थिर, दृढ व सामर्थ्यसंपन्न असल्यामुळे त्या संकल्पामध्ये प्रचंड
मोठी शक्ति असते.
यामुळे ज्ञानी पुरुष जी जी कामना करतो, मग ती कामना ऐहिक किंवा पारलौकिक
असेल, इतकेच नव्हे, तर ती कामना स्वतःसाठी केलेली असेल किंवा अन्य लोकांच्यासाठी
केलेली असेल, ती प्रत्येक कामना पूर्ण होते. याचे कारण तो पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने
पूर्ण तृप्त व कृतकृत्य असतो. त्याची
मूलभूत असणारी कामना किंवा भोगवासना गळून पडते.
श्रुति म्हणते –
या वेद निहितं गुहायां परमे व्योमन् |
(तैत्ति. उप. २-१)
जो ज्ञानी पुरुष हे
स्वरूप स्वतःच्याच बुद्धिगुहेमध्ये पाहतो, त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्याला मिळविण्यासारखे,
भोगण्यासारखे, ज्ञान घेण्यासारखे, ऐकण्यासारखे, करण्यासारखे काहीही शिल्लक राहत
नाही. तो पूर्ण तृप्त, आप्तकाम होतो.
श्रुति म्हणते –
श्रोत्रियस्य
चाकामहतस्य | (तैत्ति. उप. २-८-३)
तोच श्रोत्रिय,
ब्रह्मज्ञानी पुरुष अकामहत होतो. त्याला प्राप्त होणाऱ्या आनंदाची कोणीही कल्पनाच
करू शकत नाही. तो स्वतःच आनंदस्वरूप होतो. या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या आनंदाच्या अंशमात्र
आनंदावर इंद्रादि देवदेवता जगतात.
- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment