Saturday, May 28, 2016

कर्म आणि आत्मज्ञान प्राप्ति | Actions and Self-Realization


संपूर्ण संसाराचे, दुःखाचे मूळ कारण म्हणजेच अविद्या होय.  अविद्या म्हणजेच स्वस्वरूपाचे अज्ञान - अविद्याकामकर्मग्रंथि आहे.  त्याचा निरास करण्याचे सामर्थ्य अपराविद्येमध्ये नाही, कारण अपराविद्या कर्मात्मक आहे.  या विद्येमध्ये कर्म-कर्मफलाचे प्रतिपादन केलेले आहे.  काय करावे आणि काय करू नये ?  त्याचप्रमाणे अमुक एक कर्म केले की, त्याचे अमुक एक फळ मिळेल, याप्रमाणे ही विद्या फक्त कर्म आणि कर्मफळाचेच प्रतिपादन करते आणि म्हणून ती विद्या कर्मपरच असल्यामुळे ती कार्माचाच निरास करू शकत नाही.

ज्याप्रमाणे, अंधाराचा नाश करावयाचा असेल तर अंधाराच्या विरोधी असणारा घटक म्हणजेच प्रकाश आवश्यक आहे. तसेच, कर्माचा नाश करावयाचा असेल तर कर्माच्या विरोधी घटक पाहिजे.  परंतु ही अपरा विद्या कर्माच्या विरोधी नाही, तर उलट ती कर्मात्मक आहे.  कर्म, कर्मफलपर आहे.  हेच अधिक स्पष्ट करण्यासाठी येथे टीकाकार सुंदर दृष्टांत देतात –

तुम्ही शंभर वेळेला रोज उठून प्राणायाम केला, तरी शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भास झाला असेल आणि कोणीतरी सांगितले की “ अरे ! ही चांदी नाही, शिंपला आहे. ” यावर तो मनुष्य जर म्हणत असेल की, “ जरा थांबा ! मी प्राणायाम करतो, साधना करतो आणि साधनेने माझ्या भासाची निवृत्ति होईल. ”  असे शंभर नव्हे, लाखो प्राणायाम केले, हजारो कर्मे केली, जप-जाप्य, व्रत-वैकल्ये पूजा केली, तपश्चर्या केली, तरी त्याच्यामुळे चांदीचा भास निरास होत नाहीजोपर्यंत शिंपल्याचे दर्शन होत नाही, शिंपल्याचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत शिंपल्याच्या अज्ञानाची निवृत्ति अन्य कोणत्याही साधनाने होऊ शकत नाही.

अविद्या आणि कर्म हे एकमेकांच्या विरोधी नसल्यामुळे कर्म कधीही अविद्येचा ध्वंस करू शकत नाही.  फक्त ज्ञानच कर्माच्या, अज्ञानाच्या विरोधी आहे.  त्यामुळे फक्त ज्ञानच अज्ञानाचा ध्वंस करू शकते.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- हरी ॐ

No comments:

Post a Comment