Tuesday, May 3, 2016

स्वस्वरूप – दूर की समीप ? | The Self – Far or Near ?


भगवान गीतेमध्ये म्हणतात -
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेSखिलम् |
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ||  (गीता अ. १५-१२) 

“ हे अर्जुना !  ज्या सूर्याचा प्रकाश अखिल जगातला प्रकाशमान करतो, ते तेज माझेच आहे, असे जाण.  तेच तेज चंद्रामध्ये, अग्नीमध्ये आहे. ” असे ते स्वरूप अत्यंत दूर आहे.  विश्वामध्ये ज्या ज्या वस्तू दूर आहेत, त्याहीपेक्षा ते स्वरूप दूर आहे.  म्हणजेच ते अज्ञानी लोक आहेत, त्यांना ते स्वरूप अत्यंत दुर्विज्ञेय असल्यामुळे अत्यंत दूर आहे.

त्या प्राकृत बुद्धीच्या लोकांना कितीही उपदेश दिला तरी त्यांच्या बुद्धीला काहीही आकलन होत नाही.  त्यांच्या दृष्टीने ब्रह्म ही एक कल्पनाच होते.  “ ब्रह्म आनंद स्वरूप आहे ”, हे शाब्दिक ज्ञान त्यांना होते, परंतु त्याचा अनुभव मात्र कधीही येत नाही.  त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो की, “ खरोखरच ब्रह्मस्वरूप आहे का? आनंद, सुख, शांति आहे का ?  की ब्रह्म ही एक केवळ कल्पनाच आहे ? ” अशा विकल्पांच्यामुळे ते लोक ब्रह्मस्वरूपापासून आणखी दूर जातात.  इतके दूर जातात की, काही वेळेस या मार्गामध्ये च्युत होतात.

परंतु श्रुति या ठिकाणी लगेचच सांगते की, ते ब्रह्म दूर नाही, तर अत्यंत समीप, अगदी जवळ या शरीरामध्येच आहे.  जे विवेकी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून तत्त्वस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करतात, साधना करतात, अंतःकरणाची शुद्धि करतात, त्यांच्यासाठी ते स्वरूप अत्यंत जवळ म्हणजेच या शरीरामध्ये आहे.  ते स्वतःचेच स्वात्मस्वरूप आहे.  ते माझ्याही आत आहे आणि सर्वांच्याही अंतःकरणामध्ये अहं अहं स्वरूपाने संनिविष्ट आहे त्यालाच सर्वांतर्यामी असे म्हणतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007




- हरी ॐ

No comments:

Post a Comment