कर्म
कोणतेही असो, त्याबाबत कधीही बेफिकीर वृत्ति ठेवू नये, निष्काळजी राहू नये, ते
कधीही टाळू नये कारण मनापासून, प्राण ओतून, कळकळीने काम केले तरच त्या कर्माचे
आशीर्वाद आपल्याला मिळतात व ते आशीर्वाद (Blessings)
साधकाला उपयुक्त ठरतात. ते कर्म आनंदवर्धन करणारे होते.
कर्मफलाच्या
नियमाप्रमाणे, जेवढे मिळायचे तेवढेच फळ मिळत असते. ते कधी कमीही नसते अथवा जास्तही नसते. मनुष्याच्या अज्ञानयुक्त कलुषित बुद्धीला ते फळ
कमी वा जास्त वाटते. फलासक्ति ठेवून केलेले कर्म आशीर्वाद तर देत
नाहीच तर उलट ते कर्म शापदायक ठरते.
साधकाची
साधना म्हणजे कर्मत्याग नाही तर कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग आहे. कर्म केले म्हणजे त्याचे फळ
मिळणारच. तेही स्वीकारले पाहिजे. जसजसे राग द्वेष कमी होतील तसतसे मन परिपक्व
होऊन कर्मफलाचा पूर्णपणे स्वीकार करील. कर्मफलाचा स्वीकार, मनाची समजूत व विषयांच्या
परिपक्वतेतून (Acceptance born out of understanding and maturity) होणे फार महत्वाचे आहे. त्या कर्मफळाला
तोंड दिलेच पाहिजे. विशेषतः ते प्रतिकूल
असेल तेव्हा ! कारण शेवटी येईल ते कर्मफळ आनंदाने स्वीकारण्याची वृत्ति किंवा
स्वभाव झाला पाहिजे. What cannot be cured must be endured.
मनाने
केलेला कर्मफळाचा स्वीकार हाच खरा स्वीकार आहे, कारण केवळ शरीराने फळाचा स्वीकार केला
तरी मनाने स्वीकार केला नसेल तर मनात प्रचंड खळबळ होईल. मन विक्षेप, दुःख, यातनांनी विदीर्ण होईल. विचाराने व विवेकाने मन अंतर्मुख होईल,
त्याप्रमाणात कर्मफळाने निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आपोआप कमी होतील. कर्मफळ शांतपणे, आनंदाने स्वीकारले जाईल. कर्मफळाची योग्य ती जाण किंवा समज (Appreciation) वाढेल. मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रत्येक कर्म
ईश्वरार्पण वृत्तीने केले पाहिजे.
- "साधना
पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment