Tuesday, January 19, 2016

प्रतिक्रियांचे मूळ कारण | Root Cause of Mental Reactions


आपल्या प्रतिक्रियांचे कारण विश्व नाही.  पण विचार न करता आपल्या सर्व सुखदुःखांचे कारण आपण बाहेर शोधतो.  या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांचा दोष मूलतः आपल्या मनात, वृत्तीत आहे.  कारण सतत प्रसंग येतच राहणार.  आपण कोणत्या वृत्तीने त्या प्रसंगाच्या फलाचा स्वीकार करतो, त्या वृत्तीवर सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव अवलंबून आहे.

म्हणूनच एखाद्याला फार चांगल्या प्रसंगात ठेवले तरी तो सुखी होईलच, असे सांगता येत नाही.  याउलट एखाद्याला अत्यंत यातनामय, वाईट प्रसंगात ठेवले तरीही तो आनंदी व प्रसन्न राहू शकेल.  यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या मनातील राग-द्वेष म्हणजेच Likes & Dislikes हेच प्रतिक्रियांचे मूळ कारण आहेत.  या रागद्वेषामधूनच आपण सतत विश्व पाहतो, प्रत्येक प्रसंग पाहतो व रागद्वेषामधूनच कर्मफलाचे मूल्यमापन सतत करतो.

प्रत्यक्ष कर्म व कर्मफल बंधनकारक नसून त्याच्या फळाची अपेक्षा वृत्ति ही माणसाला बंधनकारक होते.  म्हणून शास्त्रकार म्हणतात की, जितक्या अपेक्षा जास्त तितक्या प्रमाणात अपेक्षाभंग जास्त.  जितका अपेक्षाभंग जास्त तितके नैराश्य, वैफल्य जास्त. याचमुळे जितके विक्षेप वा क्षोभ जास्त तितके बंधन जास्त.  कर्मफलाच्या अपेक्षेच्या वृत्तीने कर्म केले तर दुःखच मिळते.  ते कर्म पुन्हा पुन्हा संसाराला व जन्ममृत्यूला कारणीभूत ठरते.  उलटपक्षी फलेच्छाविरहित कर्म मनाला शांति, समाधान व आनंद देते, सुख देते, चित्तशुद्धि करते.  ते कर्म आत्मज्ञानप्राप्तीला अप्रत्यक्ष साधन होते व संसारातून मुक्त करते.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात: “ हे अर्जुना, तू मुमुक्षु आहेस. त्यामुळे आत्मज्ञानप्राप्ति हे तुझे साध्य असल्याने कर्मफलाचा तू त्याग कर.  जे फळ मिळेल त्याचा पूर्णपणे स्वीकार कर.  कर्माचा कधीही त्याग न करता निःस्वार्थ बुद्धीने कर्म कर.  कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे.  त्याच्या फलावर तुझा अधिकार नाही. ”

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
- हरी ॐ

No comments:

Post a Comment