Tuesday, December 1, 2015

सद्गुरू ईश्वरापेक्षा श्रेष्ठ | Sadguru Greater than the Almighty


गुरु ईश्वरस्वरूपच असल्याने शिष्यासाठी गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच उपासना व गुरु हीच सेवा आहे.  त्याने अखंडपणे कायावाचामनसा गुरुभक्ति करावी, कारण गुरु आत्मोपदेश देऊन त्याचा आत्मोद्धार करतात.  गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत.  गुरूंच्यापेक्षा ईश्वर सुद्धा श्रेष्ठ नाही.  गुरु हेच जिज्ञासूच्या जीवनातील अंतिम व अत्युत्तम तपस आहे.  आत्मज्ञान प्रदान करून जीवाचा उद्धार करणाऱ्या गुरुसेवेपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तपस नाही.

भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूंच्याकडेच पाठवितो. म्हणून गुरुचरणाचा आश्रय घ्यावा.  याचसाठी स्वतः परिपूर्ण ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने सुद्धा सांदिपनी गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा व उपासना केली.  परमश्रेष्ठ गुरुस्थानी असणाऱ्या महात्म्यांचा संग, सहवास अत्यंत दुर्लभ, अनाकलनीय व निश्चितपणे फलदायी असतो.  यासाठी ईश्वर शोधण्यापेक्षा गुरु शोधावा.

गुरु हेच स्थान इतके पूज्य, पवित्र व पावन करणारे आहे की, तेथे शिष्याने यत्किंचितही व्यावहारिक बुद्धि ठेऊ नये.  व्यावहारिक बुद्धि ठेवल्याने गुरूंचे आशीर्वाद मिळत नाहीत, कारण व्यावहारिक बुद्धि सदैव रागद्वेष व अपेक्षायुक्त असते.  शिष्याने संपूर्णपणे गुरुचरणी समर्पण होऊन एकनिष्ठपणे सेवा करावी.  गुरुसेवा हीच ईश्वरसेवा होय.  गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना.  गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा !

ईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरूंच्यावर अनन्यसाधारण भक्ति असेल, नितान्त श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल तर वेदान्तातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला सहज उलगडते, कळते.  तत्त्वप्रतिपादन व तत्त्वानुभूति आपोआप होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
- हरी ॐ

No comments:

Post a Comment