‘विषाद’
शब्दाचा अर्थ खिन्नता, खेद, उत्साहाचा अभाव असणे. ही मनाची अंतरिक अवस्था आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये
सांख्ययोग, कर्मयोग, कर्मसंन्यासयोग, ध्यानयोग, विभूतियोग, पुरुषोत्तमयोग या
प्रकारचे अनेक योग भगवंतांनी स्पष्ट केलेले आहेत. प्रत्येक योगाचा निश्चित संबंध आणि हेतु लक्षात
ठेऊनच त्यांचा उपदेश केलेला आहे. कोणताही
योग निरर्थक नाही. त्याचप्रमाणे अज्ञान
आणि अज्ञानजन्य अहंकार आणि ममकार तसेच त्यामधून निर्माण होणारा भावनांचा उद्रेक
आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे अर्जुनाला मोह आणि शोक निर्माण होऊन विषाद होण्यात
व त्याची शक्ति क्षीण होण्यात झाला.
विषादयोगाचे
एक विशेष महत्व आहे की, विषाद प्राप्त झाल्याशिवाय शुद्ध निरतिशय आनंदाचे महत्व
कळणार नाही. बंधनात अडकल्याशिवाय
स्वातंत्र्याचे महत्व कळत नाही. दुर्बलतेशिवाय
बलाचे महत्व पटत नाही. तसेच विषाद जरी
प्राप्त करणे योग्य नसले तरी त्यानेच आनंद आणि उत्साह याचे महत्व अधिक वाढते, एवढे
मात्र खरे !
नैराश्य
आणि अंतरिक विषादामुळे अर्जुनाला आत्मशांतीचे खरे महत्व कळते म्हणून आत्मशांति
प्राप्त करण्यासाठी ‘विषाद’ ही पहिली अवस्था आहे. ती मनुष्याला अंतर्मुख बनवून विचार करायला
प्रवृत्त करते. मनुष्यामध्ये असलेला कर्तुम्
– अकर्तुम् अहंकार नष्ट होतो. मनुष्य
अत्यंत अगतिक होऊन नम्र होतो. त्याच
वेळी तो आत्मशांतीसाठी अधिकारी होतो. म्हणून
या विषादाला ‘योग’ म्हटले आहे.
प्रत्येक
मनुष्याला हा विषाद कोणत्या न कोणत्या प्रसंगामध्ये होतच असतो. गीतेचा उपदेश प्रत्येक विषादाच्या प्रसंगामध्ये
उपयोगी पडणारा आहे हे निश्चित. भगवद्गीता
ही मनुष्याचा खेद, नैराश्य दूर करून जीवनामध्ये आत्मानंद देणारी आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment