Friday, June 26, 2015

संतांची प्रार्थना | Saints' Prayer


‘प्रार्थना’ या शब्दाला अतिशय महत्व आहे.  ‘प्रार्थना’ म्हणजे केवळ शब्द नाहीत,  रोज म्हणून टाकण्याचे श्लोक नाहीत.  तर ‘प्रार्थना’ म्हणजे अंतःकरणामधील आर्त भाव होय.  आपण देवासमोर रोज उभे राहतो.  परंतु आपल्याला अति घाई असते.  अनेक कामांच्यापैकी ‘देवाला जाणे’ हे एक काम आपण उरकून टाकतो.  कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दहा-पंधरा मिनिट लांब बसून निरीक्षण केले तर समजते की, आपणही मंदिरामध्ये जातो, देवाला यंत्रवत् नमस्कार करतो, डोके टेकले जाते, हात जोडले जातात.  नंतर आपण मंदिराच्या बाहेर पडतो.  म्हणुनच आज आपण सर्वकाही करतो, परंतु त्यामध्ये भक्तीचा भाव नसतो.  याला ‘प्रार्थना’ म्हणत नाहीत.

खरे तर आपणही व्यवहारामध्ये सतत प्रार्थनाच करतो.  ‘प्रार्थना’ या शब्दामध्ये मूळ धातु ‘अर्थ’ याचा अर्थ आहे – मागणे.  आपण सतत कोणालातरी काहीतरी मागतच असतो.  याचना करीत असतो.  आपली मागण्यांची यादी सदासर्वदा तयार असते.  सर्व बाह्य विषय, भोग, धन, स्थावर-जंगम, मालमत्ता, सत्ता, मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ति, भौतिक समृद्धि याच सर्व याचना आहेत.  एक माणूस दुसऱ्या मर्त्य माणसाकडेच याचना करतो.  मग तो कोणीही असो.

सर्वसामान्य मनुष्य व संत यांच्या प्रार्थनेत फरक आहे.  संतांनी कधीही भौतिक समृद्धि, ऐश्वर्य व भोग मागितले नाहीत तर संतांनी ईश्वराचे दर्शन, ईश्वराच्या प्राप्तीची याचना केली.  सर्व संतांनी, आचार्यांनी प्रार्थनेमधून आपले आर्त भाव ईश्वराच्या चरणी अर्पण केलेले आहेत.  संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी मागितलेले पसायदान ही सुद्धा प्रार्थनाच आहे.

संतांनी एखाद्या मर्त्य माणसाजवळ याचना केली नाही तर विश्वाधीपति, जगन्नायक, षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वराजवळच याचना केली.  इतकेच नव्हे, तर संतांनी स्वतःसाठी न मागता जे काही मागितले ते विश्वकल्याणासाठीच मागितले.  म्हणुनच संतांची प्रार्थना ही अलौकिक आहे.

- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013




- हरी ॐ

Tuesday, June 23, 2015

सगुणोपासना आणि निर्गुणोपासना | Attribute and Attribute-less Worship


सगुणोपासनेत उपासक एखाद्या सगुण, साकार मूर्तीला परमेश्वर मानून तिच्या पूजाअर्चेत किंवा ध्यानात मग्न असतो.  विषयांच्या मागे भरकटणाऱ्या चंचल मनाला इष्ट देवतेवर किंवा नाममंत्रावर केंद्रित करून उपासनेत चित्तवृत्ति स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो.  त्यामुळे विषयांचे चिंतन थांबते, आसक्ति हळुहळू कमी होऊ लागते, मनाची अंतर्मुखता वाढत जाते.  परिणामी मन शुद्ध आणि शांत होते.  मनाची वृत्ति जसजशी अधिकाधिक स्थिर होत जाईल तसतशी साधकाला अधिकाधिक शांति, समाधान, आनंद मिळत जाईल.

साधकाला होणारा हा आनंद अखंड आणि चिरंतन नसतो.  मनोवृत्ति शुद्ध सात्विक बनून त्यातील विचार आणि विकार पूर्ण लयाला जाऊन मन जेव्हा पूर्ण शांत होते तोपर्यंतच तो आनंद अनुभवतो.  पण साधक आणि उपास्य देवता या द्वैताची जागृति झाली म्हणजे इष्ट देवतेच्याच दृढ उपासनेने आपण आणखी आनंद अनुभवावा, अशी इच्छा होते.  द्वैतात साधक, इष्टदेवता आणि उपासनेचा आनंद ही त्रिपुटी उरतेच.  सगुणोपासनेत द्वैताची भावना सुटत नाही.  उपासकाला आनंद मिळतो पण उपासक स्वतः आनंदस्वरूप होत नाही.

निर्गुणोपासनेने मिळणाऱ्या आनंदाचे स्वरूप यापेक्षा वेगळे आहे.  त्या उपासनेत ‘साधक आणि आत्मतत्त्व हे एकच आहेत’ असा साक्षात्कार होतो.  ‘मीच आनंदस्वरूप आहे. मी आणि आनंद दोन भिन्न वस्तू नाहीत’ याची प्रचीति येते.  मी म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच मी अशी अवस्था अनुभवता येते.  जेव्हा साधकच आनंदस्वरूप होतो तेव्हा साधक आणि साध्य ही एकरूप झालेली असतात.  त्यावेळी साधना संपते.

साधक हा सिद्ध पुरुष झालेला असतो.  त्यावेळी तो आनंद अनुभवत नसून तो स्वतःच आनंदस्वरूप होतो.  साधक-साधना-साध्य ही त्रिपुटी नष्ट होते.  अद्वैताचा साक्षात्कार होतो.  साधनेची परिसमाप्ति आनंद अनुभवण्यात नसून आनंदस्वरूप होण्यात आहे.  ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ही अवस्था प्राप्त होते.  सगुणोपासना आणि निर्गुणोपासना यात हा मोठा फरक आहे.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001




- हरी ॐ

Tuesday, June 16, 2015

व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन | Material and Spiritual Life


व्यावहारिक जीवन जगत असताना इच्छा, वासना, आकांक्षा यांचा सर्वस्वी त्याग केला पाहिजे असे कुठेच सांगितलेले नाही.  मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबरच वासनाही येतात.  त्या त्याला सुटत नाहीत.  विषयप्राप्तीची त्याची इच्छा ही अगदी स्वाभाविक आहे.  त्याचप्रमाणे विविध विषय भोगण्याची त्याची इच्छाही तितकीच नैसर्गिक आहे.  विषयप्राप्तीचे महत्वाचे साधन पैसा.  म्हणून अर्थार्जन हे त्याच्या जीवनातील एक महत्वाचे अंग आहे.

आपल्या जीवनातील आशा-आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी मनुष्याची धडपड असली, ती महत्वाकांक्षा त्याने बाळगली तर त्यात काहीच चूक नाही.  पण विषयांचा उपभोग घेऊन विषयसुखाची वासना कधीही तृप्त होत नाही ही गोष्ट विसरता कामा नये.

मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ति सुखासीनतेकडे असल्याने त्याचे लक्ष प्रामुख्याने ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांच्यावर असते.  नीति-अनीति, धर्म-अधर्म इ. गोष्टींचा विचार न करता, नीतिमूल्ये धाब्यावर बसवून ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांच्यामागे मनुष्य लागला तर स्वैरता आणि उच्छश्रुंखलपणा वाढेल.  त्या स्वैरपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनमूल्यांचे किंवा धर्माचे बंधन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काही आचारसंहिता हवीच.  आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाला आवश्यक तो पैसा प्रत्येकाने मिळवावा, पण त्या अर्थार्जनाला मर्यादा हवी.

स्वार्थाला आणि नीतिमूल्यांना किती महत्व देतो यावर जीवनाची यशस्विता अवलंबून आहे.  नीतिमूल्यांना महत्व देऊन गरीबीतही जीवन जगणारा मनुष्य खरा यशस्वी आहे.  अर्थकाम हे जीवनाचे अंग आहे. जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचे ते एक साधन आहे.  ते साध्य असू शकत नाही.  ही शिकवण आपल्या मनावर बिंबवली पाहिजे.  ‘धर्म’ या महत्वाच्या पुरुषार्थामुळे अर्थ-काम यांच्यावर नियंत्रण राहू शकते.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001





- हरी ॐ

Tuesday, June 9, 2015

जगन्मिथ्या | World is Futile


‘जगन्मिथ्या’ असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ‘मिथ्या’ शब्दाचा अर्थ काय ?  विश्वाची अनुभूति आपल्याला सारखी येत असते.  मग ते मिथ्या म्हणजे खोटे कसे मानावयाचे ?  मिथ्या म्हणजे खोटे नव्हे.  ते दिसते.  आपण त्याचा अनुभव घेतो.  तेव्हा ते नाही असे कसे म्हणता येईल ?  पण ‘ते दिसते म्हणून सत्य आहे’ हा युक्तिवाद टिकणारा नाही.

जीवनात अनेक गोष्टी आपणाला दिसतात, पण आपण त्या तशा स्वरूपात सत्य म्हणून स्वीकारीत नाही.  उदाहरणार्थ, आपण पूर्व क्षितिजावर सूर्य उगवताना व पश्चिम क्षितिजावर मावळताना पाहतो.  पण शास्त्रीयदृष्ट्या पहिले असता सूर्योदय किंवा सूर्यास्त हे वास्तवात नाहीत.  अंतरिक्षात सूर्य नेहमीच तळपत आहे.  पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त हे भासतात.  वस्तुतः सूर्य बारा महिने चोवीस तास तळपतच असतो.  तसेच विश्वही दिसते, अनुभवला येते म्हणून ते सत्यच आहे असे म्हणता येणार नाही.

शास्त्रकार म्हणतात, एखादी वस्तू जर सत्य असेल, तिच्याच रूपाने चिरंतन टिकणारी असेल, तर तिचा बाध कशानेही होणार नाही.  ती त्रिकालबाधित असते आणि ती वस्तू जर असत्य असेल, तर तिची अनुभूति कधीच येणार नाही.  विश्वाची अनुभूति आपल्याला फक्त जागे असतानाच येते.  ती अनुभूति तात्कालिक आहे.  स्वप्नात किंवा झोपेत विश्वाची प्रचीति येत नाही.  त्या दोन अवस्थांत विश्व बाधित होते.

शाश्वत सत्य असलेले आत्मतत्त्व मात्र याही अवस्थांनी बाधित होत नाही.  कार्यरूप विश्व हे मायाकल्पित आहे, रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे न टिकणारे, बाधित होणारे आहे. म्हणून ते असत्य मानले पाहिजे.  ते भासत असले तरी मायाकल्पित आहे.  वास्तव नाही.  ते अंतिम सत्य नाही.  अंतिम सत्य परब्रह्म आहे.  विश्व हे अनुभवाने व विचाराने बाधित होते म्हणून ते असत् ठरते व दुसऱ्या बाजूने प्रतीत होते म्हणून सत् ही ठरते.  परंतु ते एकतर्फी फक्त ‘सत्’ ही नाही व ‘असत्’ ही नाही म्हणजेच ते मिथ्या आहे.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001




- हरी ॐ

Tuesday, June 2, 2015

भारतीय व पाश्चिमात्य तत्त्वज्ञान | Indian and Western Philosophy


पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया भिन्न आहे.  पाश्चिमात्य तत्त्वज्ञ काही कल्पना गृहीत धरून आपले विचार मांडताना दिसतात.  त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान एक प्रकारची बौद्धिक मीमांसाच आहे.  पाश्चिमात्य तत्त्वज्ञांनी ‘मनुष्ययोनी लाभलेला मी’, ‘इतर विश्व’, ‘त्या सर्वांचा निर्माता’ यासारखे तत्त्वज्ञानाचे विषय बौद्धिक पातळीवर हाताळले आहेत.  त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाला काही मर्यादा पडतात.

तत्वज्ञ झाला तरी प्रत्येकाच्या बुद्धीची झेप कमीजास्त असते.  बुद्धीची दिशा भिन्न असते.  प्रत्येक तत्त्ववेत्ता आपल्या बुद्धीनुसार कल्पना (Concept) धारण करणार.  त्यामुळे त्या त्या कल्पनेवर अधिष्ठित विचारपरंपराही भिन्न भिन्न असणार.  त्यातून होणारे ज्ञान हे खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञान होऊ शकत नाही, कारण, ‘तत्त्व’ म्हणजे अंतिम सत्य.  ते न बदलणारे, एकरूप असणारे सर्वांना समान प्रचीति देणारे असते.

भारतीय तत्त्वज्ञान हा शब्दप्रयोग वस्तुतः बरोबर नाही.  आपल्या तत्त्वज्ञानाचा उगम भारतात झाला म्हणून त्याला भारतीय म्हणायचे इतकेच !  हे तत्त्वज्ञान भारतापुरते मर्यादित नसून सर्व विश्वाला लागू पडणारे आहे.  ‘अनुभूति’ हे आपल्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप आहे.  ते केवळ बौद्धिक मीमांसा नाही.  आपल्या तत्त्वज्ञानात विचारांपेक्षा प्रचीतीला किंवा ज्ञानाला महत्त्व आहे.  ज्ञान हे मनुष्याच्या कल्पनेवर किंवा बुद्धीवर अवलंबून नसून ज्ञेय वस्तूवर अवलंबून असते.  ‘ज्ञानं वस्तुतन्त्रत्वात् |’

गुलाबाचे फूल घेतले तर सर्वांनाच गुलाबाच्या फुलाचे ज्ञान होणार.  त्यापासून एकाला गुलाबाच्या, दुसऱ्याला शेवंतीच्या किंवा तिसऱ्याला निशिगंधाच्या फुलाचे ज्ञान होणार नाही.  ज्ञान हे यथार्थ म्हणजे ज्ञेय वस्तू असेल त्याच स्वरूपाने होणारे, तसेच सम्यक म्हणजे परिपूर्ण सर्वस्पर्शी असते.  अंतिम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजे आपले तत्त्वज्ञान.  या कल्पनेनुसार आपले तत्त्वज्ञान म्हणजे अंतिम सत्याची-तत्त्वाची अनुभूति किंवा साक्षात्कार आहे.  पाश्चिमात्य आणि भारतीय तत्त्वज्ञानामधील हा मौलिक फरक आहे.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001





- हरी ॐ