Friday, June 26, 2015

संतांची प्रार्थना | Saints' Prayer


‘प्रार्थना’ या शब्दाला अतिशय महत्व आहे.  ‘प्रार्थना’ म्हणजे केवळ शब्द नाहीत,  रोज म्हणून टाकण्याचे श्लोक नाहीत.  तर ‘प्रार्थना’ म्हणजे अंतःकरणामधील आर्त भाव होय.  आपण देवासमोर रोज उभे राहतो.  परंतु आपल्याला अति घाई असते.  अनेक कामांच्यापैकी ‘देवाला जाणे’ हे एक काम आपण उरकून टाकतो.  कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दहा-पंधरा मिनिट लांब बसून निरीक्षण केले तर समजते की, आपणही मंदिरामध्ये जातो, देवाला यंत्रवत् नमस्कार करतो, डोके टेकले जाते, हात जोडले जातात.  नंतर आपण मंदिराच्या बाहेर पडतो.  म्हणुनच आज आपण सर्वकाही करतो, परंतु त्यामध्ये भक्तीचा भाव नसतो.  याला ‘प्रार्थना’ म्हणत नाहीत.

खरे तर आपणही व्यवहारामध्ये सतत प्रार्थनाच करतो.  ‘प्रार्थना’ या शब्दामध्ये मूळ धातु ‘अर्थ’ याचा अर्थ आहे – मागणे.  आपण सतत कोणालातरी काहीतरी मागतच असतो.  याचना करीत असतो.  आपली मागण्यांची यादी सदासर्वदा तयार असते.  सर्व बाह्य विषय, भोग, धन, स्थावर-जंगम, मालमत्ता, सत्ता, मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ति, भौतिक समृद्धि याच सर्व याचना आहेत.  एक माणूस दुसऱ्या मर्त्य माणसाकडेच याचना करतो.  मग तो कोणीही असो.

सर्वसामान्य मनुष्य व संत यांच्या प्रार्थनेत फरक आहे.  संतांनी कधीही भौतिक समृद्धि, ऐश्वर्य व भोग मागितले नाहीत तर संतांनी ईश्वराचे दर्शन, ईश्वराच्या प्राप्तीची याचना केली.  सर्व संतांनी, आचार्यांनी प्रार्थनेमधून आपले आर्त भाव ईश्वराच्या चरणी अर्पण केलेले आहेत.  संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी मागितलेले पसायदान ही सुद्धा प्रार्थनाच आहे.

संतांनी एखाद्या मर्त्य माणसाजवळ याचना केली नाही तर विश्वाधीपति, जगन्नायक, षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वराजवळच याचना केली.  इतकेच नव्हे, तर संतांनी स्वतःसाठी न मागता जे काही मागितले ते विश्वकल्याणासाठीच मागितले.  म्हणुनच संतांची प्रार्थना ही अलौकिक आहे.

- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
- हरी ॐ

No comments:

Post a Comment