Tuesday, June 23, 2015

सगुणोपासना आणि निर्गुणोपासना | Attribute and Attribute-less Worship


सगुणोपासनेत उपासक एखाद्या सगुण, साकार मूर्तीला परमेश्वर मानून तिच्या पूजाअर्चेत किंवा ध्यानात मग्न असतो.  विषयांच्या मागे भरकटणाऱ्या चंचल मनाला इष्ट देवतेवर किंवा नाममंत्रावर केंद्रित करून उपासनेत चित्तवृत्ति स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो.  त्यामुळे विषयांचे चिंतन थांबते, आसक्ति हळुहळू कमी होऊ लागते, मनाची अंतर्मुखता वाढत जाते.  परिणामी मन शुद्ध आणि शांत होते.  मनाची वृत्ति जसजशी अधिकाधिक स्थिर होत जाईल तसतशी साधकाला अधिकाधिक शांति, समाधान, आनंद मिळत जाईल.

साधकाला होणारा हा आनंद अखंड आणि चिरंतन नसतो.  मनोवृत्ति शुद्ध सात्विक बनून त्यातील विचार आणि विकार पूर्ण लयाला जाऊन मन जेव्हा पूर्ण शांत होते तोपर्यंतच तो आनंद अनुभवतो.  पण साधक आणि उपास्य देवता या द्वैताची जागृति झाली म्हणजे इष्ट देवतेच्याच दृढ उपासनेने आपण आणखी आनंद अनुभवावा, अशी इच्छा होते.  द्वैतात साधक, इष्टदेवता आणि उपासनेचा आनंद ही त्रिपुटी उरतेच.  सगुणोपासनेत द्वैताची भावना सुटत नाही.  उपासकाला आनंद मिळतो पण उपासक स्वतः आनंदस्वरूप होत नाही.

निर्गुणोपासनेने मिळणाऱ्या आनंदाचे स्वरूप यापेक्षा वेगळे आहे.  त्या उपासनेत ‘साधक आणि आत्मतत्त्व हे एकच आहेत’ असा साक्षात्कार होतो.  ‘मीच आनंदस्वरूप आहे. मी आणि आनंद दोन भिन्न वस्तू नाहीत’ याची प्रचीति येते.  मी म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच मी अशी अवस्था अनुभवता येते.  जेव्हा साधकच आनंदस्वरूप होतो तेव्हा साधक आणि साध्य ही एकरूप झालेली असतात.  त्यावेळी साधना संपते.

साधक हा सिद्ध पुरुष झालेला असतो.  त्यावेळी तो आनंद अनुभवत नसून तो स्वतःच आनंदस्वरूप होतो.  साधक-साधना-साध्य ही त्रिपुटी नष्ट होते.  अद्वैताचा साक्षात्कार होतो.  साधनेची परिसमाप्ति आनंद अनुभवण्यात नसून आनंदस्वरूप होण्यात आहे.  ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ही अवस्था प्राप्त होते.  सगुणोपासना आणि निर्गुणोपासना यात हा मोठा फरक आहे.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001
- हरी ॐ

No comments:

Post a Comment