पाश्चिमात्य
तत्त्वज्ञानाचा पाया भिन्न आहे. पाश्चिमात्य
तत्त्वज्ञ काही कल्पना गृहीत धरून आपले विचार मांडताना दिसतात. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान एक प्रकारची
बौद्धिक मीमांसाच आहे. पाश्चिमात्य
तत्त्वज्ञांनी ‘मनुष्ययोनी लाभलेला मी’, ‘इतर विश्व’, ‘त्या सर्वांचा निर्माता’
यासारखे तत्त्वज्ञानाचे विषय बौद्धिक पातळीवर हाताळले आहेत. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाला काही मर्यादा
पडतात.
तत्वज्ञ
झाला तरी प्रत्येकाच्या बुद्धीची झेप कमीजास्त असते. बुद्धीची दिशा भिन्न असते. प्रत्येक तत्त्ववेत्ता आपल्या बुद्धीनुसार
कल्पना (Concept) धारण करणार. त्यामुळे त्या त्या
कल्पनेवर अधिष्ठित विचारपरंपराही भिन्न भिन्न असणार. त्यातून होणारे ज्ञान हे खऱ्या अर्थाने
तत्त्वज्ञान होऊ शकत नाही, कारण, ‘तत्त्व’ म्हणजे अंतिम सत्य. ते न बदलणारे, एकरूप असणारे सर्वांना समान प्रचीति देणारे असते.
भारतीय
तत्त्वज्ञान हा शब्दप्रयोग वस्तुतः बरोबर नाही. आपल्या तत्त्वज्ञानाचा उगम भारतात झाला म्हणून
त्याला भारतीय म्हणायचे इतकेच ! हे
तत्त्वज्ञान भारतापुरते मर्यादित नसून सर्व विश्वाला लागू पडणारे आहे. ‘अनुभूति’ हे आपल्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप
आहे. ते केवळ बौद्धिक मीमांसा नाही. आपल्या तत्त्वज्ञानात विचारांपेक्षा
प्रचीतीला किंवा ज्ञानाला महत्त्व आहे. ज्ञान
हे मनुष्याच्या कल्पनेवर किंवा बुद्धीवर अवलंबून नसून ज्ञेय वस्तूवर अवलंबून असते.
‘ज्ञानं वस्तुतन्त्रत्वात् |’
गुलाबाचे
फूल घेतले तर सर्वांनाच गुलाबाच्या फुलाचे ज्ञान होणार. त्यापासून एकाला गुलाबाच्या, दुसऱ्याला
शेवंतीच्या किंवा तिसऱ्याला निशिगंधाच्या फुलाचे ज्ञान होणार नाही. ज्ञान हे यथार्थ म्हणजे ज्ञेय वस्तू असेल
त्याच स्वरूपाने होणारे, तसेच सम्यक म्हणजे परिपूर्ण सर्वस्पर्शी असते. अंतिम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजे आपले
तत्त्वज्ञान. या कल्पनेनुसार आपले
तत्त्वज्ञान म्हणजे अंतिम सत्याची-तत्त्वाची अनुभूति किंवा साक्षात्कार आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय तत्त्वज्ञानामधील हा
मौलिक फरक आहे.
- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति,
२००१
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment