Tuesday, June 16, 2015

व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन | Material and Spiritual Life


व्यावहारिक जीवन जगत असताना इच्छा, वासना, आकांक्षा यांचा सर्वस्वी त्याग केला पाहिजे असे कुठेच सांगितलेले नाही.  मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबरच वासनाही येतात.  त्या त्याला सुटत नाहीत.  विषयप्राप्तीची त्याची इच्छा ही अगदी स्वाभाविक आहे.  त्याचप्रमाणे विविध विषय भोगण्याची त्याची इच्छाही तितकीच नैसर्गिक आहे.  विषयप्राप्तीचे महत्वाचे साधन पैसा.  म्हणून अर्थार्जन हे त्याच्या जीवनातील एक महत्वाचे अंग आहे.

आपल्या जीवनातील आशा-आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी मनुष्याची धडपड असली, ती महत्वाकांक्षा त्याने बाळगली तर त्यात काहीच चूक नाही.  पण विषयांचा उपभोग घेऊन विषयसुखाची वासना कधीही तृप्त होत नाही ही गोष्ट विसरता कामा नये.

मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ति सुखासीनतेकडे असल्याने त्याचे लक्ष प्रामुख्याने ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांच्यावर असते.  नीति-अनीति, धर्म-अधर्म इ. गोष्टींचा विचार न करता, नीतिमूल्ये धाब्यावर बसवून ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांच्यामागे मनुष्य लागला तर स्वैरता आणि उच्छश्रुंखलपणा वाढेल.  त्या स्वैरपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनमूल्यांचे किंवा धर्माचे बंधन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काही आचारसंहिता हवीच.  आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाला आवश्यक तो पैसा प्रत्येकाने मिळवावा, पण त्या अर्थार्जनाला मर्यादा हवी.

स्वार्थाला आणि नीतिमूल्यांना किती महत्व देतो यावर जीवनाची यशस्विता अवलंबून आहे.  नीतिमूल्यांना महत्व देऊन गरीबीतही जीवन जगणारा मनुष्य खरा यशस्वी आहे.  अर्थकाम हे जीवनाचे अंग आहे. जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचे ते एक साधन आहे.  ते साध्य असू शकत नाही.  ही शिकवण आपल्या मनावर बिंबवली पाहिजे.  ‘धर्म’ या महत्वाच्या पुरुषार्थामुळे अर्थ-काम यांच्यावर नियंत्रण राहू शकते.

- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001

- हरी ॐ

No comments:

Post a Comment