‘जगन्मिथ्या’
असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ‘मिथ्या’ शब्दाचा अर्थ काय ? विश्वाची अनुभूति आपल्याला सारखी येत असते. मग ते मिथ्या म्हणजे खोटे कसे मानावयाचे ? मिथ्या म्हणजे खोटे नव्हे. ते दिसते. आपण त्याचा अनुभव घेतो. तेव्हा ते नाही असे कसे म्हणता येईल ? पण ‘ते दिसते म्हणून सत्य आहे’ हा युक्तिवाद
टिकणारा नाही.
जीवनात
अनेक गोष्टी आपणाला दिसतात, पण आपण त्या तशा स्वरूपात सत्य म्हणून स्वीकारीत नाही. उदाहरणार्थ, आपण पूर्व क्षितिजावर
सूर्य उगवताना व पश्चिम क्षितिजावर मावळताना पाहतो. पण शास्त्रीयदृष्ट्या पहिले असता सूर्योदय किंवा
सूर्यास्त हे वास्तवात नाहीत. अंतरिक्षात
सूर्य नेहमीच तळपत आहे. पृथ्वी स्वतःभोवती
फिरत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त हे भासतात. वस्तुतः सूर्य बारा महिने चोवीस तास तळपतच असतो.
तसेच विश्वही दिसते, अनुभवला येते म्हणून
ते सत्यच आहे असे म्हणता येणार नाही.
शास्त्रकार
म्हणतात, एखादी वस्तू जर सत्य असेल, तिच्याच रूपाने चिरंतन टिकणारी असेल, तर
तिचा बाध कशानेही होणार नाही. ती
त्रिकालबाधित असते आणि ती वस्तू जर असत्य असेल, तर तिची अनुभूति कधीच येणार नाही. विश्वाची
अनुभूति आपल्याला फक्त जागे असतानाच येते. ती अनुभूति तात्कालिक आहे. स्वप्नात किंवा झोपेत विश्वाची प्रचीति येत
नाही. त्या दोन अवस्थांत विश्व बाधित होते.
शाश्वत
सत्य असलेले आत्मतत्त्व मात्र याही अवस्थांनी बाधित होत नाही. कार्यरूप विश्व हे मायाकल्पित
आहे, रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे न टिकणारे, बाधित होणारे आहे. म्हणून ते
असत्य मानले पाहिजे. ते भासत असले तरी
मायाकल्पित आहे. वास्तव नाही. ते अंतिम सत्य नाही. अंतिम सत्य परब्रह्म आहे. विश्व हे अनुभवाने व विचाराने बाधित होते
म्हणून ते असत् ठरते व दुसऱ्या बाजूने प्रतीत
होते म्हणून सत् ही
ठरते. परंतु ते एकतर्फी फक्त ‘सत्’ ही नाही व ‘असत्’ ही नाही म्हणजेच ते मिथ्या आहे.
- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति,
२००१
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
- Reference: "Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2001
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment