Tuesday, December 16, 2014

कर्म आणि ज्ञानातील फरक | Difference between Karma and Knowledge


कर्माचा विधि ज्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला दिलेला आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाचा विधीही अज्ञानी पुरुषालाच दिला जातो.  आत्मा वारे द्रष्टव्यः |  हा आदेश श्रुतीने अज्ञानी पुरुषालाच दिलेला आहे.  मग कर्म आणि ज्ञान यांत फरक काय आहे ?

यावर आचार्य उत्तर देतात – अधिकारिभेदात् |  अत्यंत कामुक असणारा पुरुष कर्माचा अधिकारी आहे.  त्याच्या अंतःकरणात अनंत कामना आहेत.  याउलट ज्ञानाचा अधिकारी यापेक्षा भिन्न आहे.  विवेकवैराग्यसंपन्न, निष्काम, अंतर्मुख साधकच ज्ञानाचा अधिकारी आहे.  ‘अंतःकरणशुद्धयर्थं इदं अहं करिष्ये | ज्ञानवैराग्यसिद्धयर्थं इदं अहं करिष्ये |’  हा त्याचा संकल्प असतो.  तो विश्वाचे परीक्षण करून विषयांच्या मर्यादा समजावून घेवून त्यापासून निवृत्त होतो.

श्रुति म्हणते – ‘जिज्ञासु साधकाने कर्मजन्य असणाऱ्या इहलोक आणि परलोकाचे परीक्षण करून त्या सर्व भोगांच्या आसक्तीमधून मनाने निवृत्त व्हावे, कारण अकर्मस्वरूप असणारा आत्मा कर्माने प्राप्त होत नाही.’  असा साधनचतुष्टयसंपन्न साधकच ज्ञानाचा अधिकारी आहे.  म्हणून कर्म व ज्ञान या दोन्हींचेही अधिकारी व प्रयोजन दोन्हीही पूर्णतः भिन्न आहेत.

अन्य कर्मपर मंत्र जीवाला जन्मानुजन्मे – पुनरपि जननं पुनरपि मरणम् | या संसारचक्रामध्येच अडकवितात.  कर्तृत्व-भोक्तृत्व निर्माण करतात.  अनेक कल्पनांच्यामध्ये मनुष्य अडकतो.  मनुष्य स्वतःभोवती जंजाळ निर्माण करतो आणि जन्मानुजन्मे या संसारचक्रामध्येच परिभ्रमण करीत राहतो. 

याउलट ईशावास्यादि मंत्रांच्यामधून आत्मज्ञान सांगितले जाते.  या ज्ञानाने सर्व अध्यासाचा, विपरीत भावनांचा निरास होतो.  अध्यासामधून निर्माण झालेल्या ‘देहो‌‍ऽहं, मनुष्योऽहं, कर्ता अहं, भोक्ता अहं, सुखी अहं, दुःखी अहं, संसारी अहं’ या सर्व कल्पना नाश पावतात.  शोक-मोहाचा निरास होतो.  आत्यंतिक दुःखाची निवृत्ति व निरतिशय सुखाची प्राप्ति होते.  परमपुरुषार्थाची प्राप्ति होते.  याप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांचा अनुबंधचतुष्टय अत्यंत भिन्न आहे.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

No comments:

Post a Comment