Wednesday, December 10, 2014

अहंकाराचा भार | The Load of Ego


भक्त ज्यावेळी आपला सर्व भार परमेश्वरावर टाकतो त्याचवेळी समर्पण भावना निर्माण होते, कारण त्यामध्ये अहंकार आणि ममकार या दोन वृत्तींचे समर्पण होते.  म्हणून भक्त म्हणतो –

यत् कृतं यत् करिष्यामि तत्सर्वं न मया कृतम्  |
त्वया कृतं तु फलभुक् त्वमेव मधुसूदन  ||

जे काही मी केले आहे आणि जे मी करेन ते वस्तुतः मी केलेले नाही किंवा करणारही नाही.  ते सर्व तूच केलेले आहेस.  म्हणून हे मधुसूदन !  त्याचे फळ सुद्धा तूच उपभोग, हा भक्ताचा भाव असतो.

उदा. रेल्वेने प्रवास करताना जर एखादा भाजीवाला रेल्वेत बसून विचार करावयास लागला की, रेल्वे आधीच सामानाने आणि लोकांच्या भाराने वाकली आहे, त्यात मी माझ्या टोपलीचा भार आणखीन कशाला देऊ ?  तर त्याच्यासारखा मूर्ख तोच !  जर टोपली डोक्यावर घेऊन गाडीत बसला तर त्या अर्धशहाण्याला कोण समजविणार ?  की बाबारे !  या सर्व भाराबरोबर तुझा आणि टोपलीचा भारही रेल्वेच वाहात आहे.

तद्वत अज्ञानी जीवाचे आहे.  मी माझा भार वाहाण्यास समर्थ आहे.  मी सर्व संकटावर व दुःखावर मात करेन, या पोकळ अहंकाराने तो जगत असतो.  पण प्रत्यक्षात मात्र विश्वकर्ता परमेश्वरच सर्वांचा भार वाहात असतो.  त्याच्या नियमानेच हे विश्व सुसूत्रपणे कार्य करीत असते.  म्हणून सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वरच सर्वांचा रक्षणकर्ता आहे; परंतु अज्ञानी मनुष्य मात्र ते कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि संसारात अडकतो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ

No comments:

Post a Comment