Tuesday, May 27, 2014

भगवद्गीतेचे वैशिष्ठ्य | Uniqueness of Bhagwat Geeta


 
विश्वामधील सर्व ग्रंथ निरनिराळ्या प्रकाराने बाह्य विषयांचे ज्ञान देतात.  मग ते भौतिकशास्त्र असो, शरीरशास्त्र किंवा मानसशास्त्र वगैरे कोणतेही शास्त्र असो.  परंतु जीवनाचे गूढ रहस्य उलगडून जीवनाला दिशा देणारा, प्रेरणा आणि स्फूर्ति देणारा, जीवनाचा विकास करून जीवन परिपूर्ण करणारा असा एकही मार्गदर्शक ग्रंथ नाही.

याउलट अनेक प्रकारच्या विषयांचे ज्ञान मनुष्याच्या मनामध्ये रागद्वेष, कामक्रोधलोभ वगैरेदि विकार निर्माण करून विषयासक्त बनविते.  मनुष्यामधील श्रद्धा, प्रेम, सेवा, कर्तव्यपरायणता, त्याग, निस्वार्थ वृत्ति, माणुसकी नाहीशी करते.  मनुष्य अधिक उन्नत न होता स्वैर, उच्छ्रुंखल, हिंसाचारी, पशुतुल्य बनतो.  हेच आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.  त्यामुळे जगामध्ये असा एकही ग्रंथ नाही की, जो मनुष्याच्या अंतःकरणामधील पाशवी आणि राक्षसी प्रवृत्तींचा नाश करून सद्गुणांचा, श्रेष्ठ नीतिमूल्यांचा उत्कर्ष करून मनुष्याला सद्विचार आणि सदाचारामध्ये प्रवृत्त करेल.  जीवनाचे सर्वांगसुंदर दर्शन घडविणारा असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय.

भगवद्गीता आरशाप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचे दर्शन देणारा अलौकिक ग्रंथ आहे.  आपल्या स्वतःचा चेहरा आपल्याजवळच असूनही आपण कधीही पाहू शकत नाही.  तो अत्यंत जवळ असूनही फार फार दूर आहे.  तो पाहाण्यासाठी आरशाची आवश्यकता असते.  त्यासाठी आरसा हा साधन होतो.

त्याचप्रमाणे जीवनाचे खरे परिपूर्ण दर्शन आपल्या अंतरंगामध्येच स्वस्वरूपाने आहे.  परंतु अज्ञानाच्या आवरणामुळे ते दिसत नाही, अनुभवायला येत नाही.  ते दर्शन घेण्यासाठी असलेला आरसा म्हणजेच ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय.  या महाकाव्यामधून भगवंतांनी हळूवारपणे प्रत्येकाचे अंतरंग उलगडून स्वस्वरूप प्रकट केलेले आहे.  भगवद्गीतेचे चिंतन करणे योग्य कर्तव्य आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ
 

Tuesday, May 20, 2014

मनुष्यजन्माचा प्रवाह | Flow of Human Life

 

या दुर्लभ मनुष्यजन्मामध्ये प्रत्येकाची एकच अंतरिक, उत्स्फूर्त इच्छा आहे की, “मी सुखी व्हावे”. आपले जीवन शांतीने आणि आनंदाने परिपूर्ण करणे, हेच मनुष्याचे परमकर्तव्य आहे.

जीवनात अनेक प्रकारची व्यावहारिक कर्तव्ये आहेत.  परंतु ती सर्व प्रसंग किंवा परिस्थिति यांच्या अनुषंगाने मनुष्यनिर्मित सापेक्ष आहे.  त्यामुळे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात तडजोड होत असते.  त्यामध्ये काळानुरूप सतत बदल होत असतो.  परंतु “मी सुखी व्हावे” यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ शकत नाही, कारण ती मनुष्यामध्ये सहजस्वाभाविक प्रवृत्ति आहे.  त्यामुळे मनुष्याला “मी सुखी व्हावे” या इच्छापूर्तीमध्ये स्वातंत्र्य नाही.

ज्याप्रमाणे, नदी एखाद्या डोंगरामध्ये संतत धारेच्या रूपाने उगम पावते आणि क्रमाक्रमाने तिचा विस्तार होऊन अखंड प्रवाहित होते.  तिच्या प्रवाहामध्ये छोटे-मोठे कितीही अडथळे आले तरी त्या सर्वांच्यावर मात करून ती सतत सागराच्या दिशेने धावत असते, कारण सागराशी एकरूप होण्यामध्येच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता, परिपूर्णता असते.  त्याचप्रमाणे सर्व मानवी जीवन सुखाच्या दिशेने, ध्येयाने प्रेरित होऊन नदीप्रमाणेच अखंड गतिमान आहे.

भगवान म्हणतात – मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः |  (गीता अ. ३-२३)

हे पार्थ ! सर्व मानवजात माझ्याच – परमेश्वराच्या मार्गाचे, म्हणजे निरतिशय आनंदाच्या मार्गाचेच सर्व प्रकारे अनुसरण करते.

स्वतःच्या सुखासाठीच मनुष्य सर्वांच्यावर प्रेम करतो. यावरून सिद्ध होते की, मनुष्य पूर्ण सुखी होईपर्यंत सतत, अखंडपणे सुखाच्या मागे धावतो, कारण तोच मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

 
- हरी ॐ
 

Tuesday, May 13, 2014

तितिक्षेमधून प्रसन्नता | Cheerfulness through Endurance

 
 
कोणत्याही अनुभवामध्ये तीन घटक असतात –
१.   ज्या विषयांचा अनुभव घेतो ते विषय
२.   ज्यांच्या साहाय्याने अनुभव घेतो ती इंद्रिये आणि
३.   ज्याठिकाणी सुखदुःखाचा अनुभव येतो ते मन
 
यामध्ये तीन्हीही घटक सतत बदलणारे आहेत.  हा प्रत्येकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे.  मग सतत बदलणाऱ्या विकारयुक्त, अस्थिर मनामध्ये बदलणाऱ्या इंद्रियांच्या साहाय्याने अनित्य विषयांच्यामधून नित्य, स्थिर टिकणारा अनुभव कसा मिळेल ?  शक्यच नाही.
 
म्हणून बाहेरून प्रसंग बदलून चालणार नाही.  प्रयत्न करा किंवा न करा, प्रसंग हे येणारच !  म्हणून मनाची दृष्टि बदलणे हाच पुरुषार्थ आहे.  त्यासाठी भगवान अर्जुनाला आणि सर्व साधकांना उपदेश देतात – तान् तितिक्षस्व भारत |  सर्व प्रसंग, विषय आणि अनुभव यांचे वरीलप्रमाणे स्वरूप जाणून घेऊन सहनशीलता वाढविणे हाच पुरुषार्थ आहे.  हीच साधना आहे.
 
तितिक्षा किंवा सहनशीलता हा साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा गुण आहे.  सहनशीलता हा शरीराचा गुण नसून अंतःकरणाचा आहे.  मन कोणत्याही प्रसंगामध्ये प्रसन्न ठेवणे हा अभ्यास म्हणजेच तितिक्षा होय.  कोणताही प्रसंग स्वतःच्या रागद्वेषामधून किंवा अपेक्षेमधून न पाहाता जसा आहे तसा वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहाण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे व्यक्तिगत रागद्वेषामधून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया कमी होतील.  पर्यायाने रागद्वेष कमी होऊन मन रागद्वेषरहित होऊन शांत, संयमित, विक्षेपरहित, अंतर्मुख होईल.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
- हरी ॐ

Thursday, May 8, 2014

विषयांचे मिथ्यात्व | Futility of Worldly Objects

 
 
भगवान अर्जुनाला आणि प्रत्येक साधकाला उपदेश देतात – दोष बाहेर नाहीत तर तुझ्या मनातच आहेत.  ते काढ.  म्हणजे बाकी सर्व तसेच राहिले तरी तुझ्यावर परिणाम होणार नाही.  तू विचलित न होता शांत, स्थिर होशील.  स्वस्थ होशील.  यासाठी भगवान स्वतःच तर्कशुद्ध युक्तिवाद देतात.  सुखदुःखात्मक अनुभवाला येणारे प्रसंग नित्य नाहीत.  तर ते सर्वच येणारे आणि जाणारे आहेत.
 
१.  इंद्रियांचा विषयांशी झालेला संनिकर्ष आणि त्यातून आलेला अनुभव नित्य नाही, कारण संयोग कर्तृत्वाने, प्रयत्नाने निर्माण केलेला आहे.  त्यामुळे जोपर्यंत संयोग आहे, तोपर्यंतच अनुभव आहे.  तसेच संयोग असेल तर वियोग होणारच !  म्हणून प्रत्येक संयोग हा वियोगात्मकच आहे !
 
२.  ज्या विषयांचा संयोग होतो त्या विषयांचे स्वरूप काय आहे ?  कोणताही विषय नित्य नाही तर विकारयुक्त, अनित्य आहे.  म्हणून कितीही प्रयत्न केले तरी किंवा अपेक्षा केली तरी संयोग कधीही नित्य टिकणार नाही.  संयोगातून उपभोग घेताना विषयाचा क्षय होतो.
 
३.  बाह्य विषय नाशवान असल्यामुळे त्यातून येणारे अनुभव सुद्धा नित्य नाहीत.  याप्रमाणे काळाच्या ओघात अनेक प्रसंग आले आणि गेले.  त्या प्रत्येक प्रसंगाला सुरुवात आणि शेवट आहे.  म्हणून सर्व अनित्य आहे.  मग तो प्रसंग सुखकारक असो किंवा कितीही दुःखकारक, असह्य असो.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 

 
 
                                                            - हरी ॐ