Tuesday, January 7, 2014

वैषयिक सुख व सहजानंद | Real and Unreal Happiness



वैषयिक सुख हे जेव्हा इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग होतो तेव्हा त्यांच्या उपभोगामधून मिळणारे सुख आहे.  म्हणजेच हे सुख विषय आणि इन्द्रियांच्या सन्निकर्षावर अवलंबून आहे.  परंतु – यत् कृतकम् तत् अनित्यम् | या न्यायाने जे कर्माने किंवा प्रयत्नाने मिळवलेले असते, ते नाश पावते हा लोकप्रसिद्ध अनुभव आहे.

म्हणजेच जोपर्यंत इंद्रिये आणि विषयांचा संयोग आहे, तोपर्यंतच सुख मिळते. संयोग संपला की त्यामधून मिळणाऱ्या सुखाचाही नाश होतो.  म्हणून हे सुख पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे अत्यंत क्षणिक, अनित्य आणि चंचल आहे हे सिद्ध होते.

तसेच वैषयिक सुख जसे अनित्य आहे त्याचप्रमाणे ते तरतमभावयुक्त आहे.  ती सुखाची अनुभूती तीन प्रकारे येते –
 
१. प्रियआपल्याला प्रिय असणाऱ्या विषयाच्या केवळ दर्शनाने जे सुख मिळते, त्या सुखाच्या वृत्तीला ‘प्रिय’ असे म्हणतात.

२. मोद – तीच प्रिय वस्तु जेव्हा आपल्या स्वतःच्या मालकीची होते तेव्हा त्या सुखवृत्तीला ‘मोद’ असे म्हणतात.

३. प्रमोद – जेव्हा प्रिय वस्तूचा प्रत्यक्ष उपभोग होतो त्यामुळे उपभोग घेण्याची वृत्ति पूर्ण होते. अशा सुखवृत्तीला ‘प्रमोद’ असे म्हणतात.

प्रिय, मोद आणि प्रमोद या वृत्ति अंतःकरणामध्ये विशेष गुणवृत्तीने निर्माण होत असल्यामुळे, त्यामधून प्राप्त होणारे सुख साहजिकच तरतमभावयुक्त, सोपाधिक, इंद्रियजन्य आणि क्षणिक आहे.

याउलट सहजानंद हा सहजस्वाभाविक स्वरूपाचा आनंद आहे.  त्यामुळे तो वैषयिक आनंदाप्रमाणे इंद्रियांचा अनुभवण्याचा विषय नसून, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगावर अवलंबून नाही.  म्हणून त्याला निर्विषयक, निरुपाधिक स्वरूपाचा आनंद असेही म्हणतात.

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

No comments:

Post a Comment