Tuesday, January 28, 2014

खरा आनंद म्हणजे काय ? | What is Real Bliss?




जोपर्यंत प्रिय विषयाची वृत्ति आहे तोपर्यंत आनंद आहे, आणि विषयवृत्ति संपली की हा आनंदही संपतो.  व्यावहारिक आनंद म्हणजे प्रिय विषयाच्या सान्निध्याने निर्माण झालेल्या विशेष वृत्तीमध्ये पडलेले आनंदस्वरूप आत्म्याचे प्रतिबिंब आहे.  हा शुद्ध आनंदाचा एक भास आहे.

याउलट आत्मसुख हे निस्तरंग सहज आनंदस्वरूप आहे.  हा आनंद इंद्रिये व विषय यांच्या संयोगामधून निर्माण होत नसल्यामुळे तो सोपाधिक, वैषयिक नाही.  तर तो सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद आहे.  हा परिपूर्ण आनंद कशातही अंतर्भूत नाही.  तसेच तो अथांग, अंतर्बाह्य परिपूर्ण आहे.

अन्तःपूर्णः बहिःपूर्णः पूर्णकुम्भ इवार्णवे |
अन्तःशून्यः बहिःशून्यः शून्यकुम्भ इवाम्बरे ||

ज्याप्रमाणे समुद्रामध्ये बुडविलेला कुंभ आतून बाहेरून सर्व बाजूंनी पाण्याने परिपूर्ण असतो, किंवा रिकामा केलेला घट आकाशामध्ये आतून बाहेरून सर्व बाजूंनी रिकामा असतो.  त्याप्रमाणे या आनंदसागरात रममाण होणारा ब्रह्मज्ञानी अंतर्बाह्य परिपूर्ण असतो.

मोठा जलाशयच मिळाल्यानंतर इतर लहान जलाशयांची (आड, विहीर वगैरे) आवश्यकता राहात नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदाची प्राप्ति झाल्यानंतर त्या विद्वान पुरुषाला आनंदासाठी वेदांचीही आवश्यकता राहात नाही.  हाच आनंद परिपूर्ण करणारा, पूर्ण तृप्ति देणारा, कृतकृत्य करणारा आहे.

या आनंदामध्ये रजोगुण, तमोगुणाबरोबर सत्वगुणही गळून पडतो.  आनंद हे स्वतःचे स्वरूप बनते.  आनंद आणि मी भिन्न न राहाता ‘मी’ स्वतःच आनंदस्वरूप होतो.  तेथे आनंदाची इच्छाही शिल्लक राहात नाही.  तेथे सर्व कामना, इच्छा गळून पडतात.  राहातो तो फक्त निर्भेळ आनंद ! 
 

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

No comments:

Post a Comment