Tuesday, August 27, 2013

परमेश्वर आहे | God exists




परमेश्वर माझ्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणून परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे चुकीचे आहे, कारण विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या मला दिसत नाहीत, पण मी त्यांचे अस्तित्व स्वीकारतो.  त्यावर श्रद्धा ठेवतो.

उदा. माझे आईवडील मी पाहतो.  त्यांचेही आईवडील म्हणजे माझे आजी-आजोबा पाहतो.  त्यांचेही आईवडील म्हणजे माझे पणजी-पणजोबा कदाचित पाहतो.  त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील मी पाहिलेले नाहीत.  ते कसे होते हेही मला माहीत नाही.  मग “मी त्यांना पाहिले नाही, म्हणून ते नाहीत”, असे म्हटले तर काय होईल ?  यावर विचार केला तर समजते की, त्यांचे अस्तित्व नाकारणे म्हणजे क्रमाक्रमाने स्वतःचेच अस्तित्व नाकारण्यासारखे आहे.

आपण “परमेश्वर आहे”, या विधानावर श्रद्धा ठेवतो आणि नास्तिक लोक “परमेश्वर नाही”, यावर विश्वास म्हणजे श्रद्धा ठेवतात.  काही नाही, असे समजण्यासाठी सुद्धा काहीतरी असण्याची, कोणत्यातरी अस्तित्वाची, सत्तेची आवश्यकता आहे.  मग त्या सत्तेला “परमेश्वर” असा शब्द वापरला किंवा वापरला नाही तरीही सत्तेचे अस्तित्व निर्विवादपणे मानावेच लागते.  म्हणून परमेश्वर नाही, असे म्हणणे म्हणजेच खरे तर अंधश्रद्धा आहे.

सर्वसामान्यतेने मनुष्य – यद् दृश्यं तत् सत्यम् इति | जे दृश्य आहे, जे डोळ्यांना दिसते त्यालाच सत्य मानतो.  म्हणूनच चार्वाक नीति प्रसिद्ध आहे –
यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं क्रुत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः || (चार्वाकनीति)

परंतु प्रत्येक विवेकी पुरुषाने दृश्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे.  दृश्याच्या अतीत असणाऱ्या तत्त्वाचा, अधिष्ठानाचा शोध घेतला पाहिजे.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ


Tuesday, August 20, 2013

मानसिक प्रगति | Mental Development



मनुष्याच्या शरीर व इंद्रियांचा विकास निसर्गनियमाप्रमाणे आपोआपच होत असतो.  जन्मल्यापासून आजपर्यंत शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये हळुहळू बदल झालेला आहे.  त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नाही.  मात्र या स्थूल शरीराच्या आत असणारे जे मन आहे, त्याचा मात्र प्रयत्नपूर्वक विकास करावा लागतो.  मनाचा विकास करण्यासाठी साधनही मनच आहे.  म्हणून तरी भगवान निश्चयपूर्वक सांगतात – उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |

मानाने मनाच्या साहाय्यानेच मनाचा विकास करावा. यासाठी मनाची दृढ संकल्पशक्ति निर्माण करावी.  आपल्या मनामध्ये आपण अनेक संकल्प करतो.  पण एक संकल्प केला रे केला की, आपलेच मन त्यावर विकल्प निर्माण करते.  छोटेसे उदाहरण घ्यावयाचे झाले तर आपण ठरवितो की “ उद्यापासून रोज सकाळी लवकर उठायचे. ” दुसऱ्याक्षणी आपल्या मनामध्ये विचार येतो की “ आपल्याला खरोखरच उठणे जमेल कां ?  आपल्या तब्येतीला झेपेल का ?  त्यापेक्षा लवकर न उठलेलेच बरे ! ”  
 
याप्रकारे आपलेच मन आपल्या संकल्पाविरुद्ध विकल्प, शंका, संशय निर्माण करते.  आपल्या संकल्पाची पूर्ण शक्ति विकाल्पामुळे खच्ची होते.  म्हणूनच आजकाल “ हे मला येत नाही, जमत नाही, माहीत नाही ” अशी उत्तरे ऐकावयास येतात.  यालाच न्यूनगंड (Inferiority Complex) असे म्हणतात.

हा नकारात्मक विचार (negative thinking), न्यूनगंड मनातून प्रथम काढून टाकला पाहिजे.  जोपर्यंत नकारात्मक विचार आहेत, तोपर्यंत मनुष्य विकास किंवा प्रगति करू शकत नाही.  असे विचार मनुष्याला सुखाने जगू देत नाहीत.  त्यामुळे जीवनामधील उत्साह, उमेद कमी होते.  मनामधील हे विकल्प कमी करण्यासाठीच जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन (positive thinking) आत्मसात केला पाहिजे.  यालाच आत्मविश्वास (self confidence) असे म्हणतात.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  सप्टेंबर २०११
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, September 2011



- हरी ॐ


Tuesday, August 13, 2013

प्रकाशमय जीवनाकडे | Towards a Bright Life



इंग्रजी वाङ्मयामध्ये थोर तत्त्वज्ञ प्लेटोने सांगितलेली एक गोष्ट आहे.  एका प्रचंड मोठ्या गुहेमध्ये एक आदिवासी जमात पिढ्यान् पिढ्या राहत होती.  अंधारामध्येच अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि काळाच्या पडद्याआड गेल्या.  त्यांना प्रकाशाची यत्किंचितही कल्पना नव्हती.

त्यांच्यामध्येच एक तरुण मुलगा “ गुहेच्या बाहेर काय असेल ? ” हे पाहण्यासाठी गुहेच्या बाहेरच्या दिशेने चालत राहिला.  पुढे-पुढे सातत्याने दीर्घकाळ गेल्यानंतर गुहेच्या तोंडाशी आल्यावर त्याला अंधारापेक्षा काहीतरी वेगळे दिसले.  तो प्रकाशकिरणांचा झोत पाहून त्याला अत्यानंद झाला.  तो उड्या मारू लागला.  त्याच आनंदामध्ये पुन्हा गुहेमध्ये येऊन त्याने आपल्या आप्तबांधवांना प्रकाशाचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला.  परंतु युगानुयुगे अंधारात राहिलेल्या त्या आदिवासींना प्रकाशाची कल्पनाच सहन झाली नाही.  त्यांनी त्या तरुण मुलाला मारून टाकले.

पुन्हा काही काळ लोटल्यानंतर दोन-तीन मुलांनी असाच प्रयत्न केला.  त्यांना ही प्रकाशाचा शोध लागला.  त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुहेमधील अन्य आदिवासींना परोपरीने समजावून दिले की, “या गुहेच्या बाहेर या !  अंधारापेक्षाही एक वेगळे असे प्रकाशमय जीवन आहे. त्यानंतर गुहेच्या बाहेर येऊन सर्वांनी प्रकाशाचा अनुभव घेतला व त्यांचे म्हणणे मान्य केले.  ही एक छोटीसी बोधप्रद कथा आहे.

याप्रमाणेच मनुष्य जीवनाचा विकास व्हावयाचा असेल तर प्रथम आपण आपल्या मनाच्या कल्पनांच्यामधून बाहेर आले पाहिजे.  मनामधील राग-द्वेष, स्वार्थ, लोभ, कूपमंडुक वृत्ति, अहंकार-ममकार या क्षुद्र मनोवृत्तींचा त्याग केला पाहिजे, कारण याच वृत्ति मनुष्याच्या मनाला पुन्हा-पुन्हा खाली खेचतात, विकास होऊ देत नाहीत.  आपण अज्ञानामधून बाहेर येऊन स्वतःच्या मनाच्या कप्प्यांमधून बाहेर पडलो तरच प्रकाशमय जीवनाचा अनुभव घेऊ शकतो.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  सप्टेंबर २०११
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, September 2011
 
  
- हरी ॐ

Wednesday, August 7, 2013

संग कोणता करावा ? | Whose Company should we have ?



जे प्राकृत, स्थूल बुद्धीचे असून उपभोग हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र आहे, अशा वैषयिक, कामुक, उद्धट, संस्कारशून्य लोकांच्या समुदायामध्ये साधकाने रममाण होऊ नये.  कारण आपण जर त्यांच्या सान्निध्यात राहिलो तर विषयांच्या मर्यादा समजूनही संगामुळे आपण विषयांच्याकडे पुन्हा आकर्षित होण्याची शक्यता आहे.  हे विषयलंपट लोक विषयांचीच महती आणि महिमा गात असल्यामुळे विषयमहात्म्य श्रवण करून आपल्या मनामध्ये भोगवृत्ति निर्माण होते.  एक कामना संसारवर्धनासाठी पुरेशी आहे.  भगवान म्हणतात –
            यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः | (गीता अ. २-४२)

कामुक लोक सतत विषयगाथाच वाचतात.  त्यामधून ते ऐहिक व पारलौकिक उपभोगांचीच प्रार्थना करतात.  अशा लोकांच्यामध्ये साधकाने रममाण होऊ नये.

जीवनामध्य तीन प्रकारचे संग आहेत – १) आपल्यापेक्षा निकृष्ट संगति असेल तर आपले अध:पतन होते.  २) आपल्यासारखीच आपल्या आचारविचारउच्चारांशी सम असणारी संगति असेल तर आपली अधोगति होत नाही, परंतु उत्कर्ष अथवा विकासही होत नाही.  ३) आपल्यापेक्षा श्रेष्ठ संगति असेल तर आपले आचार-विचार-उच्चार उदात्त होऊन आपला उत्कर्ष होते.

म्हणून साधकाने नेहमी प्रार्थना करावी –
            सुसंगति सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
            कलंक मतीचा झाडो विषय सर्वथा नावडो  ||  (मोरोपंत केकावली)

नेहमी सज्जनांची संगति करावी. दु:संगाचा त्याग करावा.  म्हणून येथे भगवान “ जनसंसद् ”, जनसमुदाय हा शब्द योजतात.  जे प्राकृत, अज्ञानी, कामुक, मदांध, उन्मत्त असतात, ज्यांच्यावर माता-पिता-आचार्य यांचे संस्कार झालेले नसतात, असा असंस्कृत लोकांचाच समुदाय, कळप असतो आणि विद्वान, अप्राकृत, विवेकी लोकांची, सज्जन्नांची विद्वत्सभा असते.  ते एकत्र आल्यानंतर सत्संग करतात.  म्हणून साधकाने सत्संगाचाच आश्रय घ्यावा.  
 
आचार्य म्हणतात –
            नेयं सज्जनसङ्गे चित्तम् |        (भज गोविन्दम्)
साधकाने आपले मन सज्जनांच्या संगतीमाध्येच न्यावे.
 

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010




- हरी ॐ