जे
प्राकृत, स्थूल बुद्धीचे असून उपभोग हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र आहे, अशा वैषयिक,
कामुक, उद्धट, संस्कारशून्य लोकांच्या समुदायामध्ये साधकाने रममाण होऊ नये. कारण आपण जर त्यांच्या सान्निध्यात राहिलो
तर विषयांच्या मर्यादा समजूनही संगामुळे आपण विषयांच्याकडे पुन्हा आकर्षित
होण्याची शक्यता आहे. हे विषयलंपट लोक विषयांचीच महती आणि महिमा
गात असल्यामुळे विषयमहात्म्य श्रवण करून आपल्या मनामध्ये भोगवृत्ति निर्माण होते. एक कामना
संसारवर्धनासाठी पुरेशी आहे. भगवान म्हणतात –
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः
| (गीता अ. २-४२)
कामुक
लोक सतत विषयगाथाच वाचतात. त्यामधून
ते ऐहिक व पारलौकिक उपभोगांचीच प्रार्थना करतात. अशा लोकांच्यामध्ये साधकाने रममाण होऊ नये.
जीवनामध्य
तीन प्रकारचे संग आहेत – १) आपल्यापेक्षा निकृष्ट संगति असेल तर आपले अध:पतन
होते. २) आपल्यासारखीच
आपल्या आचारविचारउच्चारांशी सम असणारी संगति असेल तर आपली अधोगति होत नाही,
परंतु उत्कर्ष अथवा विकासही होत नाही. ३) आपल्यापेक्षा श्रेष्ठ संगति असेल
तर आपले आचार-विचार-उच्चार उदात्त होऊन आपला उत्कर्ष होते.
म्हणून
साधकाने नेहमी प्रार्थना करावी –
सुसंगति सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झाडो विषय सर्वथा
नावडो ||
(मोरोपंत केकावली)
नेहमी
सज्जनांची संगति करावी. दु:संगाचा त्याग करावा. म्हणून येथे भगवान “ जनसंसद्
”, जनसमुदाय हा शब्द योजतात. जे प्राकृत, अज्ञानी, कामुक, मदांध, उन्मत्त
असतात, ज्यांच्यावर माता-पिता-आचार्य यांचे संस्कार झालेले नसतात, असा असंस्कृत
लोकांचाच समुदाय, कळप असतो आणि विद्वान, अप्राकृत, विवेकी लोकांची, सज्जन्नांची
विद्वत्सभा असते. ते एकत्र आल्यानंतर सत्संग करतात. म्हणून साधकाने सत्संगाचाच आश्रय घ्यावा.
आचार्य म्हणतात –
नेयं सज्जनसङ्गे चित्तम् | (भज गोविन्दम्)
साधकाने
आपले मन सज्जनांच्या संगतीमाध्येच न्यावे.
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment