स्त्री,
पुत्र, देहादीमध्ये ज्याप्रमाणे ममता असते, त्याप्रमाणे केवळ परमेश्वरामध्ये ममता
असून त्यामध्ये प्रियत्व असेल, तर तीच “भक्ति” होय, असे
भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारदादि भागवताचार्य म्हणतात.
अशी
ही अनन्य भक्ति प्राप्त करण्यासाठी काय करावे ? आपल्यासमोर अनेक आकर्षक वस्तु, विषय आहेत. आपली इंद्रिये, मन सतत बाह्य विषयांच्यामध्येच
रममाण झालेले आहे. त्यामुळे विषयांचेच
संस्कार होऊन मनामध्ये विषयांच्याच वृत्ति निर्माण होतात. विषयांच्यासाठीच मन व्याकूळ होते. उपभोगांच्यासाठी शरीर, इंद्रिये आतुर होतात. आपण स्वत:ला भक्त म्हणवून घेत असलो,
वर्षानुवर्ष परमेश्वराची पूजा केली तरी परमेश्वराच्या भेटीसाठी, त्याच्या
प्राप्तीसाठी मात्र कधीही व्याकूळ होत नाही. म्हणून आपण अजुनही विषयांचेच भक्त आहोत.
जीवनामध्ये
आपण सर्वांच्यासाठी रडतो. एखादी प्रिय व्यक्ति भेटली नाही, एखादा विषय उपभोगण्यास
मिळाला नाही, साधा चहा मिळाला नाही तरी आपण अत्यंत व्याकूळ होतो. त्यासाठी तळमळतो. व्याकुळतेशिवाय व्यवहारातील एखादी क्षुल्लक
गोष्टही मिळत नसेल तर तीव्र तळमळ निर्माण झाल्याशिवाय सर्वोत्कृष्ट, विश्वकर्त्या
परमेश्वराची तरी प्राप्ति कशी बरे होईल?
भक्त
प्रल्हाद परमेश्वराला प्रार्थना करतो,
य
प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी |
त्वामनुस्मरत:
सा मे हृदयान्मापसपर्तु || (विष्णुपुराण)
“ हे
भगवन्ता, ज्याप्रमाणे हे सर्व सामान्य, विषय लंपट, कामुक जीव विषयांच्या
प्राप्तीसाठी रात्रन्दिवस तळमळतात. त्यांना ध्यास लागतो. त्यासाठी ते वेडे होतात. विषयासक्तीमुळे विषयांच्याशिवाय एक क्षणही ते
जगू शकत नाहीत. त्याप्रमाणेच माझे मन
तुझ्यामध्ये – परमेश्वरामध्ये पूर्णपणे आसक्त होऊ दे. तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या अंत:करणात तीव्र तळमळ,
व्याकुळता निर्माण होऊ दे. हीच माझी
तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ”
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
Great!
ReplyDelete