Tuesday, July 16, 2013

अदंभित्व | Non-Pretentiousness
दंभित्वाच्या वृत्तीमुळे आपण कधीही १००% श्रवण करीत नाही.  याचे कारण आपण आपले दोष कधीच प्रांजळपणे मान्य करीत नाही.  “मी चुकलो”, हे वाक्य आपल्या शब्दकोशात नसतेच.  उलट माझे दोष हे दोष नसून ते गुण कसे आहेत, हे आपण सिद्ध करीत असतो.  उदा. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये आपल्या अशिलाची केस मांडत असताना ती सदोष आहे, हे माहीत असूनही वकील युक्तिवाद करतो, पुरावे सादर करतो आणि खरयाचे खोटे व खोट्याचे खरे करतो.  अगदी त्याचप्रमाणे आपणही आपले दोष हे गुण कसे आहेत, हे युक्तिवादाने सिद्ध करतो.  आपण आपल्या दोषांच्याकडे जाणून–बुजून दुर्लक्ष करतो.  प्रत्येक चुकीला आपण स्वत:ची सुंदर कारणमीमांसा देतो.  आपला अहंकार आपले दोष मान्य करू देत नाही.
यामुळेच शास्त्र अध्ययनामध्ये प्रतिबंध निर्माण होतात.  शास्त्रज्ञान कधीही आकलन होत नाही. म्हणून आपले मन वकिलासारखे नको.  तर न्यायाधीशासारखे हवे.  न्यायाधीश दोन्हीही पक्षांच्या बाजू शांतपणे, तटस्थपणे ऐकतो.  त्यांचे सर्व युक्तिवाद संपले की, विवेकाने योग्यायोग्यतेचा निवाडा करून योग्य, न्याय्य निर्णय देतो.
त्याचप्रमाणे आपल्या मनामध्येही दोन विरोधी वृत्तींचे द्वंद चालू असते.  अहंकार, दंभ यामुळे अनेक दोष निर्माण होतात.  मनामधील या कोणत्याही वृत्तीच्या आहारी न जाता आपले दोष अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करावेत.  यासाठी धैर्याची आवश्यकता आहे.  आपल्या स्वत:च्याच मनाला सामोरे जाण्यासाठी प्रचंड मोठ्या अंतरिक शक्तीची, सामर्थ्याची आवश्यकता आहे.  दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये पुरुषार्थ नसून स्वत:चे दोष मान्य करून ते काढून टाकणे, यातच साधकाचा पुरुषार्थ आहे.
म्हणून शास्त्रामध्ये “आत्मपरीक्षण” (Self Introspection) ही महत्वाची साधना सांगितलेली आहे. आपले दोष मान्य करणे, ही पहिली साधना आणि ते जाणीवपूर्वक काढणे ही दुसरी साधना आहे. यामुळे आपोआपच दंभित्वाची वृत्ति हळुहळू कमी होऊन अदंभित्व आत्मसात होईल.


"दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010

 

- हरी ॐ

No comments:

Post a Comment