साधकाने गुरुंचा शब्द प्रमाण मानावा. साधकाच्या जीवनामध्ये दोनच गोष्टी आहेत – एक
गुरु आणि दुसरे शास्त्र होय. तिसरी वस्तूच त्याच्या विश्वामध्ये नाही. गुरु हीच साधना, गुरु हीच सेवा, गुरु हीच
उपासना असे गुरुमय जीवन झाले पाहिजे. यालाच
भगवान गीतेमध्ये ‘आचार्योपासना’ असे म्हणतात. गुरुशिष्यांची अनेक उदाहरणे आहेत. श्रीसमर्थ आणि
कल्याण असतील, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद असतील. यामध्ये पाहिले तर समजते की, शिष्याच्या अंतःकरणामध्ये
गुरुंच्याबद्दल नितांत श्रद्धा व प्रेम हवे. त्याच्यासाठी गुरूंचा शब्द हाच शेवटचा शब्द आहे.
तोच गुरुमय जीवन जगू शकतो.
जगद्गुरु आद्य शंकराचार्य फार सुंदर सांगतात –
भावाद्वैतं सदा कुर्यात् क्रियाद्वैतं न
कर्हिचित् | अद्वैतं त्रिषु लोकेषु नाद्वैतं गुरुणा सह ||
शिष्य ज्ञानी झाला, त्याला थोडेफार शास्त्र
समजू लागले तरी सुद्धा गुरूंच्या समोर शिष्य हा शिष्यच आहे. शिष्याने हा नम्रभाव कधीही सोडू नये. आपल्या
संतांनी लिहून ठेवले आहे – पायीची वहाण पायी बरी | चप्पल फार सुंदर आहे, परंतु पायामध्येच तिचे
स्थान आहे. याप्रमाणेच शिष्याने
व्यवहार करीत असताना कधीही आपली पायरी, आपली मर्यादा उल्लंघन करू नये. त्याने कधीही गुरूंशी तुलना करू नये. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये कधीही व्यवहार येऊ
नये. याचे कारण गुरुभाव नष्ट झाला तर शिष्य
कधीही गुरुंच्याकडून अध्ययन करू शकत नाही. परंतु जर शिष्य गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला,
नम्र झाला, गुरूंच्याबद्दल एक उदात्त भाव
निर्माण केला, गुरूंच्याबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, अनन्य
भक्ति निर्माण झाली, तर त्या श्रद्धेच्या सामर्थ्यानेच व गुरूंच्या असीम करुणेने शिष्याचा
उद्धार होतो.
श्रुति म्हणते –
यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ |
तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः
|| (श्वेत.
उप. ६-२३)
जशी परमेश्वरावर अनन्य भक्ति असते,
त्याप्रमाणेच गुरूंच्यामध्ये भक्तीचा भाव निर्माण झाला, तर त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये
श्रुतींचे गूढार्थ व तत्वार्थ प्रकट होतात, त्याला ज्ञानाचा अनुभव येतो, त्याचे
जीवन कृतकृत्य, पूर्ण होऊन आनंदाने भरून जाते. तो या संसारामधून मुक्त होतो.
- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- हरी ॐ–