विचाराने तत्त्वाचे ज्ञान प्राप्त
होते. तत्त्वाच्या ज्ञानाने मनुष्याला विश्रांति
मिळते. तत्त्वविश्रांतीने मन शांत होऊन सर्व
दुःखांचा पूर्णतः क्षय होतो. वसिष्ठ मुनि येथे
अतिशय सुंदर, असा दुःखनाशाचा क्रम सांगतात. आपल्या सर्व दुःखांचा नाश व्हावयाचा असेल तर सर्वप्रथम
विचार आवश्यक आहे. मनुष्याला खरी विश्रांति
हवी असेल तर त्याचे शारीरिक-मानसिक ताणतणाव पूर्णतः दूर झाले पाहिजेत. विश्रांति घेण्यासाठी आपण शरीराने सर्व कर्मे थांबवितो
आणि शांत बसतो. त्यानंतर एक सुंदर झोप घेतो.
खूप थकल्यानंतर एक चांगली झोप झाली की, आपण
पुन्हा एकदम ताजेतवाने होतो. विश्रांतीमुळे
आपले मन पुन्हा आनंदी व प्रसन्न होते.
तसेच रामा ! मनुष्याच्या मनाला खऱ्या अर्थाने विश्रांति हवी
असेल, तर तात्पुरता उपाय करून उपयोग नाही. मनुष्य सगळ्यात जास्त थकत असेल तर तो अविचाराने
! म्हणून संसारी माणूस कायम थकलेला असतो.
थोडेसे काम केले, दोन माणसांचा स्वयंपाक केला,
ऑफिसमध्ये जाऊन आले की, थकतो. शरीराने थकणे
ही मोठी समस्या नाही. परंतु अविचारी मनुष्याचे
शरीर तर थकतेच, पण त्याबरोबर मनही थकते. काहीही
न करता तो तासन् तास आळशीपणाने बसून राहतो.
अविचार हे थकण्याचे मुख्य कारण आहे. म्हणून जरी आपण म्हणालो की, "मी विचार करून
करून थकलो", त्यावेळी तो विचार नसून सगळा अविचारच केलेला असतो. अविचारामधून रागद्वेष, स्वार्थ, कामुकता, कामक्रोधादि
विकार निर्माण होऊन ते मनुष्याला थकवितात. एका अविचारामधून दुसरा अविचार, तिसरा अविचार, असे
अविचार दृढ होत जातात. म्हणून वसिष्ठ मुनि
सिद्ध करतात की, या जगात युगानुयुगे चाललेला सर्व व्यवहार म्हणजे अविचार आहे.
परंतु रामा ! विचार मात्र एका क्षणामध्ये होतो. एखादी गोष्ट
चांगली आहे की वाईट आहे, हे एका क्षणात कोणत्याही मनुष्याला समजू शकते. विवेकी पुरुषाला क्षणार्धात योग्य गोष्टीचे ज्ञान
झाले की तो त्यामध्ये प्रवृत्त होतो. मनामध्ये
द्वंद्व, विकल्प, विकार निर्माण न झाल्यामुळे त्याचे मन शांत असते. त्यामुळे त्याला तत्त्वविश्रांतीचा लाभ होतो. याप्रकारे विचाराने, क्रमाक्रमाने त्याच्या सर्व
दुःखांचा क्षय होतो. विचार साधकाला तत्त्वाच्या
अनुभूतीपर्यंत घेऊन जातो. म्हणून रामा ! विचार हे खूप महत्त्वाचे साधन आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–