अज्ञान म्हणजेच मृत्यु आहे आणि या अज्ञानामधून निर्माण होणारे सर्व कार्य, अहंकार-ममकार म्हणजे संसार आहे. संसारालाच ‘सागर’ असे म्हटले आहे. सागराला कोणत्याही सीमा, मर्यादा नसतात. तो जसा अनंत, अपार असतो त्याचप्रमाणे अहंकारामधून निर्माण झालेल्या या संसारालाही मर्यादा नाहीत. जन्मानुजन्मे वर्धन केलेला हा संसारसागर प्रचंड मोठा, महाभयानक आहे. यामुळे याच्यापलीकडे जाणे अत्यंत अवघड आहे.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहोण्यासाठी
सामर्थ्य, शक्ति, शौर्य, धैर्य, आत्मनिष्ठा, सातत्य या सर्व गुणांची आवश्यकता आहे.
त्यासाठी “तेथे पाहिजे जातीचे
येरागबाळ्याचे काम नोहे |” त्याचप्रमाणे
हा संसाररागरही सहजासहजी कोणालाही पार करता येत नाही. त्यामध्ये कामक्रोधादि मगरी, मासे,
तापत्रयांचे वडवानले, विषयवृत्तिरूपी भोवरे असल्यामुळे संसारसागर अत्यंत भयानक असून त्यामधून सहीसलामत सुटणे
अत्यंत दुस्तर आहे. तो पार करण्यासाठी
विवेक-वैराग्यादि, शम-दमादि तसेच अमानित्वादि दैवीगुणसंपत्तीची आवश्यकता
आहे.
असा हा मृत्युरूपी संसारसागर खूप भयानक असेल
तरीही भगवान आपल्या भक्तांना अभयदान देऊन सांगतात की, तुम्ही कोणीही घाबरू नका. तुमचा उद्धार करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून तरी आपला पंढरीचा विठुराया कटीवर हात
ठेऊन उभा आहे. जणु काही तो भक्तांना
सांगतोय की, “अरे या संसारसागराचे पाणी खूप नाही. ते माझ्या कमरेएवढेच आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका.”
भगवान सुद्धा म्हणतात – सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि
| (गीता अ. ४-३६)
ज्ञानरूपी नौकेच्या साहायाने या संसारसागराच्या
परतीराला जाता येते. म्हणून या भवसागरामध्ये
एकटे जाऊ नये. नावेमध्ये बसावे. या नावेला हाकण्यासाठी अत्यंत कुशल, दक्ष
असणारा नावाडी घ्यावा. त्याच्यावर पूर्ण
विश्वास ठेवावा. नावेमध्ये बसणे हे आपले
काम आणि आपल्याला परतीराला नेणे हे त्या नावाड्याचे काम आहे. त्यामुळे त्याची काळजी आपण करू नये. या प्रवासात छोट्या-मोठ्या लाटांचे तडाखे बसले,
मोठमोठ्या मगरी, मासे दिसले तरीही घाबरू नये, विकल्प करू नये. फक्त नावाड्यावर श्रद्धा ठेवावी. तो नावाडी ‘तत्त्वमसि’
उपदेशाच्या साहायाने हळूहळू परतीराला घेऊन जातो. अज्ञानाचा ध्वंस करून ज्ञानप्राप्ति करून देतो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–