Tuesday, August 27, 2024

कपिन्याय आणि मार्जारन्याय | Monkey And Cat Method

 




भगवान ज्ञानी आणि अनन्य भक्त यांच्यामधील भेद सांगतात.  शास्त्रामध्ये दोन प्रकारचे न्याय सांगितले जातात.  १) कपिन्याय, २) मार्जारन्याय.  व्यवहारामध्ये कपि म्हणजे माकड आणि मांजराचे निरीक्षण केले तर आपल्याला दोन भिन्न प्रवृत्ति दिसतात.  माकड इकडून तिकडे उड्या मारीत असताना आपल्या पिलाला धरत नाही तर पिल्लुच माकडाला धरते.  माकड त्याला सांगते की, तूच मला घट्ट पकड.  मी तुला पकडणार नाही.  मी इकडून तिकडे उड्या मारेन.  तुला इकडून तिकडे नेईन.  परंतु तुझा हात सुटून तू पडलास तर माझा नाईलाज आहे.  मी काहीही करू शकत नाही.  तू तुझ्या कर्तृत्वाने माझ्याबरोबर ये.  त्याचप्रमाणे निर्गुण उपासक, जिज्ञासु साधक सर्व कर्तृत्व स्वतःकडे घेतो.  मी स्वतः “श्रवण-मननादि” साधना करेन.  क्रमाक्रमाने परमेश्वरस्वरूप प्राप्त करेन, अशी त्याची वृत्ति असते.  मग परमेश्वर सुद्धा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करीत नाही.

 

परंतु, याउलट मार्जारन्यायामध्ये मात्र मांजराचे पिल्लू अत्यंत केविलवाणे, असाहाय्य, अगतिक असते.  मला काहीही करता येत नाही.  माझ्यामध्ये कोणतेही सामर्थ्य नाही, असे म्हणून आपली सर्व जबाबदारी ते मांजरावर टाकते आणि ते स्वतः शांत राहाते.  त्यामुळे मांजर स्वतःच आपल्या पिल्लाची रात्रंदिवस काळजी घेते.  त्याचे सर्व प्रकारे रक्षण करते.  जरा कोठे धोका दिसला की, पिल्लाला आपल्या तोंडामध्ये अलगद धरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेते.  मांजरीचे दात पिल्लाला लागत नाहीत.  अशा प्रकारे ते पिल्लू पूर्णतः मांजरीच्या अधीन, आश्रित असते.

 

याचप्रमाणे, परमेश्वराचा भक्तही म्हणतो, हे भगवन् !  तू सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आहेस.  तूच सर्वांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता, रक्षणकर्ता असून विश्वंभर आहेस.  तूच सर्वांना सत्ता, स्फूर्ति, शक्ति देऊन सर्वांचे पोषण, वर्धन, रक्षणही करतोस.  तुझ्या केवळ अस्तित्वामुळेच सर्व जीवांना, या चराचर सृष्टीला चेतना प्राप्त होते.  तुझ्या शक्तीच्या एका अंशाने मी जगतो.  म्हणूनच मी माझा सर्व भार तुझ्या चरणी वाहिला आहे.  असे असेल तर मग उगीचच मी माझ्या उद्धाराची काळजी कशाला करू ?  मला फक्त तुझ्यावर प्रेम करता येते.  मी तुला पूर्ण भावाने शरण आलो आहे.  तेव्हा माझी सर्व काळजी तुला घेतली पाहिजे.  नव्हे, नव्हे तुझे ते कर्तव्यच आहे.  तुझे ब्रीद आहे –

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते |

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||                               (गीता अ. ९-२२)

माझ्या अनन्य भक्तांचा योगक्षेम मी – परमेश्वर चालवितो.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, August 20, 2024

विचाराचा आश्रय | Refuge Of Thinking

 



राघवा !  ज्याप्रमाणे एखाद्या राज्यामध्ये संकट निर्माण झाले तर तो राजा आपल्या विश्वासु मंत्र्यांना बोलावतो.  त्यांच्याशी विचारविनिमय व चर्चा करतो.  त्या संकटामधून कसे मुक्त व्हावे ?  त्यासाठी कोणता उपाय आहे ?  तसेच कोणता उपाय सफल होईल ?  आणि कोणता उपाय निष्फळ ठरेल ?  याचा निर्णय विचारानेच घेतला जातो.  कोणताही राजा शत्रूचे आक्रमण झाल्यानंतर अविचाराने लगेचच तलवार हातात घेत नाही.  आपली नीति काय ठरवायची, आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, हे निर्णय विचारांतीच घेतले जातात.

 

म्हणून राज्य असेल, राष्ट्र असेल, देश असेल, समाज, कुटुंब किंवा स्वतःचे व्यक्तिगत जीवन असेल, या सर्व ठिकाणी कोणतीही समस्या सोडवायची असेल तर सर्वप्रथम विचारच आवश्यक आहे.  मनुष्य एकदम उतावीळ झाला तर अविचाराने शोकमोहग्रस्त होतो आणि अशा अवस्थेमध्ये घेतलेला निर्णय पुष्कळ वेळेला चुकीचा ठरून तो दुःखाला कारण होतो.  विचार करण्यापूर्वीच त्या प्रसंगामध्ये मनामधील रागद्वेष किंवा कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर आले तर मनुष्य निरपेक्षपणाने निर्णय घेऊ शकत नाही.  म्हणून राजापासून ते सामान्य मनुष्यापर्यंत कार्याची योजना ठरविण्यासाठी विचार हेच उत्तम साधन आहे.  हे रामा !  याप्रकारे व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी जर विचार आवश्यक असेल, तर अध्यात्ममार्गामध्येही विचार पाहिजेच !

 

ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी गडद अंधारात काही पाहायचे असेल तर दीप अत्यंत आवश्यक आहे.  दिव्याच्या प्रकाशामध्ये वस्तु स्पष्ट दिसतात.  म्हणून अंधारामध्ये वस्तु चाचपडत बसण्यापेक्षा दीप प्रज्वलित करावा आणि वस्तु पाहावी.  कारण अंधारात चाचपडून, प्रयत्न करूनही वस्तु तर मिळत नाहीच, उलट आपला तोल जाऊन आपल्याला कोठेतरी इजा होते.  त्याचप्रमाणे रामा !  साधकाने क्षणाक्षणाला या विचाराचा आश्रय घ्यावा.  वेद, वेदांत, सिद्धांत या सगळ्यांचा निर्णय करताना बुद्धीने आत्मविचार करणे आवश्यक आहे.  याचा अर्थच वेदांतशास्त्राचे श्रावण-मनन-निदिध्यासना, तसेच ध्यान, कर्म, योग अशा कोणत्याही साधना करीत असताना त्यामध्ये विचाराचे सामर्थ्य पाहिजे.  विचार करताना बुद्धि सुसंस्कृत हवी आणि त्या बुद्धिवर सत्संगाचे व शास्त्रश्रवणाचे संस्कार हवेत.  अशी शुद्ध, सूक्ष्म व अंतर्मुख झालेली बुद्धि श्रुति आणि युक्तीच्या साहाय्याने शास्त्रविचार करू शकेल.  ती बुद्धि आत्मविचारामध्ये तल्लीन, तन्मय व तद्रूप होईल.  म्हणून साधकाने विचाररूपी दीपाच्या साहाय्याने आत्मानात्मविवेक करावा.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, August 13, 2024

गुरूंचे स्थान सर्वोच्च | Guru Is Supreme

 



साधकाच्या जीवनामध्ये गुरु हेच अंतिम आश्रयस्थान आहे.  गुरु हीच श्रद्धा, निष्ठा आणि साधना आहे.  शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुभाव निर्माण होणे आवश्यक आहे.  गुरुभाव म्हणजेच शरणागतीचा, प्रेमाचा, नम्रतेचा, विनयशीलतेचा उत्स्फूर्त असणारा अंतःस्फूर्त भाव होय.  “गुरु हेच माझे सर्वस्व आहे, गुरूच मला या भवसागरामधून तारून नेतील”,  या भावामध्येच साधकाचा अहंकार गुरूंच्या चरणी पूर्णतः नतमस्तक होतो.  तो रक्षणासाठी गुरूंना आर्ततेने प्रार्थना करतो.

 

त्यावेळी गुरु शिष्यावर अनुग्रह करतात.  कृपा आणि करुणा करतात.  ते शिष्याला जसा आहे तसा प्रथम मान्य (accept) करतात.  विश्वामध्ये अन्य सर्व माणसे आपल्यामधील जेवढा भाग त्यांना आवडतो, तेवढाच मान्य करतात.  बाकी सर्व अमान्य (reject) करतात.  परंतु गुरु हे एकच स्थान असे आहे की, ते शिष्याला त्याच्या गुणदोषांच्यासहित मान्य करतात.  तेच शिष्याला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन करतात.  भगवान म्हणतात –

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः |  नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता || (गीता अ. १०-११)

माझ्या अनन्य भक्तांच्यावर कृपा करण्यासाठीच मी परमात्मा गुरुस्वरूपाने अवतीर्ण होऊन शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञानरूपी अंधकाराचा ज्ञानरूपी प्रकाशाने ध्वंस करतो.

 

शास्त्रकार सांगतात –

दुर्लभो विषयत्यागः दुर्लभं तत्त्वदर्शनं |  दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना ||

गुरूंच्या कृपेशिवाय विषयांचा त्याग, तत्त्वाचे दर्शन आणि पारमार्थिक ज्ञानाची सहजावस्था प्राप्त होणे दुर्लभ आहे.  किंवा भगवान नारदमहर्षि म्हणतात – महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा | (नारदभक्तिसूत्र)

हे ज्ञान महात्म्यांच्या आणि भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते.  म्हणून संत कबीर सुद्धा म्हणतात –

गुरु गोविंद दोनु खडे काके लागू पाव |

बलिहारी गुरु मेरे जिनो गोविंद दियो बताय ||      (संत कबीर)

माझ्या समोर एकाच वेळी गुरु आणि परमेश्वर उभे राहिले, तर मी प्रथम गुरुंनाच नमस्कार करेन, कारण परमेश्वर कोठा आहे, कसा आहे ?  मला माहित नाही.  तो माझ्याशी बोलतही नाही.  परंतु गुरु मात्र मला या परमेश्वराचे स्वरूप दाखवितात.  माझ्या जीवनाला योग्य दिशा देतात.  म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, August 6, 2024

अधिष्ठान आणि त्यावरील भ्रम | Substratum And Superficial Illusion

 



श्रीवसिष्ठ मुनि येथे आणखी सखोल विचार सांगतात.  ब्रह्माजी हा कारण नाही आणि विश्व हे कार्यही नाही.  त्यामुळे ब्रह्माजीमधून विश्व निर्माण झाले, असे म्हणणे केवळ औपचारिक आहे.  मग हे सगळे दिसते ते काय आहे ?  श्रीवसिष्ठ मुनि सांगतात - यद्रुक् एव परं ब्रह्म तादृक् एव जगत् त्रयम् |  हे रामा ! संपूर्ण त्रैलोक्य हे परब्रह्मस्वरूप आहे.  म्हणून "विश्व मिथ्या आहे" असे म्हणणे म्हणजेच "विश्व परब्रह्मस्वरूप आहे" असे म्हणणे होय.

 

हे आपण दृष्टांतावरून समजावून घेऊ.  जसे पाण्यामधून लाट निर्माण होते.  पाणी हे कारण व लाट हे कार्य आहे.  असे जरी असले तरी ज्यावेळेस आपण पाण्याच्या दृष्टीने पाहतो, त्यावेळी लाट नाहीच.  फक्त पाणीच आहे.  म्हणून वस्तुतः पाणी हे कारण नाही व लाट हे कार्यही नाही.  वस्तुतः पाण्यामधून काहीही निर्माण झाले नाही.  निर्माण होतच असेल तर तो केवळ लाटेचा भास आहे.  पाण्यामधून लाट निर्माण झाली, असे म्हणणे म्हणजे वाचेचा केवळ उपचार आहे.  म्हणून लाट हा केवळ भ्रम आहे.

 

मग दिसते ते काय आहे ?  दिसते ते केवळ पाणी आहे !  म्हणून लाट नाही, असे म्हणणे म्हणजे लाट पाणीस्वरूप म्हणणे असे होय.  काहीच नाही, असे म्हणणे म्हणजे अधिष्ठानाची सत्ता मान्य करणे होय.  कारण अभावाला सुद्धा सत्ता आहे. अभावाचे ज्ञान होण्यासाठी सत्तेचीच आवश्यकता आहे.  म्हणून जग मिथ्या आहे, असे म्हणणे म्हणजे जग ब्रह्मस्वरूप आहे, असे म्हणण्यासारखे आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ