Tuesday, June 25, 2024

उदय-अस्त रहित ज्ञानवृत्ति | Unwavering Knowledge

 



ज्ञानी पुरुषाला कैवल्यप्राप्ति, निरतिशय पदाची प्राप्ति झाल्यानंतर त्याचे अंतःकरणही त्याच पदाचा आश्रय घेऊन आत्माकार होते.  ज्ञानी पुरुष स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप होतो.  चैतन्यस्वरूप कोठून येतही नाही व  कोठे जातही नाही.  ते आकाशाप्रमाणे अंतर्बाहय सर्वांना व्यत्प्त करते.  म्हणून चैतन्याकार वृत्ति ही उदय-अस्तरहित आहे.  अज्ञानी मनुष्याने श्रवण केले तर शाब्दिक ज्ञान उदयाला येते आणि थोड्या वेळाने ती ज्ञानवृत्ति निघूनही जाते.  म्हणून या मार्गात प्रवचनकार भरपूर आहेत.  प्रवचनाच्या वेळेस त्यांची ज्ञानवृत्ति येते आणि दुसऱ्यांना उपदेश दिला की त्यांची ज्ञानवृत्ति निघून जाते.  असे हे ज्ञान येणारे आणि जाणारे असेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही.

 

आत्मज्ञानी पुरुषामध्ये एकदा ही ज्ञानवृत्ति उदयाला आली की, त्याचे ज्ञान पुन्हा कधीही अस्त पावत नाही.  त्या ज्ञानामध्ये शंका, संशय, विकल्प राहत नाहीत. भयंकर मोठा प्रसंग आला तरीही ज्ञाननिष्ठ पुरुष ज्ञानापासून थोडाही विचलित होत नाही.  आभाळ कोसळले, सगळे जग बुडाले तरीही तो ज्ञानाच्या स्थितीमध्ये दृढ राहतो.  त्यासाठी विदेही जनकाचे उदाहरण प्रसिद्ध आहे.  जनक राजा म्हणतो - मिथिलायां प्रदीप्तायां न मे दहति किञ्चन |  सर्व मिथिला नगरी अग्नीने दग्ध झाली तरी माझे कधीही दग्ध होत नाही.  कारण मी या मिथिला नगरीपासून अत्यंत विलक्षण असून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप आहे.  'मी' आत्मा मात्र नित्य शाश्वत आहे.  अशा या परिपूर्ण ज्ञानाने ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.

 

इतकेच नव्हे, तर ही ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्त असणारा ज्ञानी पुरुष विदेही जनकाप्रमाणे बहिरंगाने सर्व क्रिया किंवा व्यवहार करताना दिसत असेल तरी वस्तुतः तो क्रियाशून्य असतो.  तो काही देत नाही, काही ग्रहण करीत नाही, कशाचा त्याग करीत नाही.  त्याच्या दृष्टीने शरीर शरीराचे काम करते, इंद्रिय इंद्रियांचे कार्य करतात.  असे समजून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप अकर्ता-अभोक्ता आहे, असे त्याचे ज्ञान असते.  म्हणून सर्व क्रिया करूनही तो या सर्वांच्याकडे साक्षीभावाने पाहतो.  जसे प्रारब्ध आहे, तसतसे शरीर प्रारब्धावर सोपवून तो स्वतः मात्र स्वस्वरूपामध्ये स्थित होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ