साधकाचा किंवा त्याने केलेल्या साधनेचा
कधीही नाश होत नाही. प्रारब्धक्षयाने
वर्तमान शरीराचा जरी मृत्यु झाला तरी तो पुण्यात्मा जीव साधनेचे सर्व संस्कार घेऊन
पुढच्या योनीमध्ये प्रवेश करतो. तो कधीही दुर्गतीला जात नाही किंवा त्याचे अधःपतनही
होत नाही. साधनेच्या संस्कारांच्या
प्रभावाने पुढच्या जन्मी सुद्धा त्याचे मन सत्त्वगुणप्रधानच होते. कदाचित काही वेळेला
एखाद्या पापकर्माच्या प्रभावाने त्याला
अधोयोनी मिळाली म्हणजेच पशुपक्ष्यांचे शरीर मिळाले तरी चांगले संस्कार नष्ट होत
नाहीत.
मागच्या जन्मी जर सत्त्वगुणांचे अनेक संस्कार झाले असतील तर या जन्मी कुत्र्याची
अधोयोनी मिळाली तरीही तो कुत्रा अत्यंत सात्त्विक वातावरणामध्ये वाढेल. एखाद्या
मंदिरामध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये त्याला
सत्संग मिळेल. जिथे वेदघोष चालतील, जिथे
प्रवचन, कीर्तन, भजन, सत्संग चालू आहे, अशा महात्म्यांच्या सान्निध्यात त्याला
राहायला मिळेल. त्यामुळे त्या योनीमध्ये सुद्धा
जीवाचे अधःपतन होणार नाही हे सिद्ध होते. कर्माचे
भोग भोगले की, त्या जीवाला पुन्हा पुढची योनी मिळेल.
समजा, एखादा साधक साधना करीत असताना मृत
झाला व त्याच्या अंतःकरणामध्ये काही विषयांच्या कामना असतील तर तो पुढच्या जन्मी
अत्यंत चारित्र्यसंपन्न, शुद्ध, पवित्र व श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.
त्यामुळे त्याच्या कामना सहजच पूर्ण होतील
व त्या पूर्ण झाल्या की, लगेचच त्याचे पूर्वजन्मींचे संस्कार जागृत होऊन तो
सर्वसंगपरित्याग करेल व पुन्हा साधनेत प्रवृत्त होईल.
किंवा याउलट एखादा साधक प्रखर वैराग्यसंपन्न
असेल, मनामध्ये कोणतीही कामना नसेल व त्याचा साधना करता-करता मृत्यु झाला तर
पुढच्या जन्मी तो सदाचारसंपन्न, मात्र अत्यंत गरीब परंतु भक्तिसंपन्न आईवडिलांच्या
पोटी जन्म घेईल. काही काळ घरामध्ये
राहील आणि अत्यंत लहान वयामध्ये त्याच्या अंतःकरणात पूर्वजन्मीचे साधनेचे
संस्कार जागृत झाले की, तो घरादाराचा त्याग करून साधनेमध्ये प्रवृत्त होईल. तो पुन्हा अत्यंत जोमाने व उत्साहाने तीव्र
गतीने साधना करेल व मोक्षाची प्राप्ति करून घेईल.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ–