Tuesday, March 26, 2024

प्रारब्धाचा पुरुषार्थासाठी उपयोग | Using Fate for Duty






मनुष्य जीवनामध्ये एका बाजूला आहे प्रारब्ध !  आणि दुसऱ्या बाजूला आहे पुरुषार्थ !  प्रारब्ध समोर आल्यानंतर ते टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे जे येईल त्याला आनंदाने सामोरे जाणे हाच मनुष्याचा खरा पुरुषार्थ आहे.  म्हणून मनुष्य विवेकाच्या साहाय्याने, इच्छाशक्तीने जे जे कर्तृत्व करतो ती सर्व कर्म म्हणजेच त्याने केलेला पुरुषार्थ आहे.

 

मनुष्यामध्ये मात्र जन्मतःच अत्यंत अलौकिक विवेकशक्ति असते.  या बुद्धीच्या साहाय्याने योग्य-अयोग्य, कर्तव्य-अकर्तव्य याचा योग्य निर्णय घेऊन मनुष्याला स्वतःच्या जीवनाचा विकास करता येतो.  म्हणून बहिरंगाने अन्य प्राण्यांच्याप्रमाणेच मनुष्याला शरीर, इंद्रिये जरी असतील, तरी विधात्याने त्यांना अत्यंत दुर्मिळ अशी असणारी विचारशक्ति प्रदान केलेली आहे.  या शक्तीमुळेच मनुष्याला प्रारब्धाबरोबरच पुरुषार्थ करण्याची एक संधी मिळालेली आहे.

 

मनुष्याने प्रारब्ध भोगत असताना पुरुषार्थ करावा.  प्रारब्ध व पुरुषार्थ हे एकमेकांच्या विरोधी नाहीत.  किंवा प्रारब्धामुळे पुरुषार्थ करता येत नाही असे नाही.  काही लोकांना जीवनामध्ये पुरुषार्थ जमला नाही तर ते लोक सगळा दोष स्वतःच्या प्रारब्धालाच देतात.  पण खरे तर प्रारब्ध आहे म्हणूनच पुरुषार्थ आहे.  आपल्या जीवनात संकटे येतात, सुखदुःखात्मक द्वन्द्वे येतात.  प्रतिकूल परिस्थिति येते, त्याचवेळी त्या प्रसंगांच्यामध्ये मन समतोल ठेवण्याचा पुरुषार्थ करता येतो.  त्यामुळे प्रारब्धाच्याच साहाय्याने आपण आपले जीवन उदात्त व उत्तुंग करू शकतो.

 

म्हणून कोणीही प्रारब्धाला दोष देऊ नये.  प्रारब्धावर विसंबूनही राहू नये.  तर उलट त्याच प्रारब्धाचा उपयोग करून मनुष्याने जीवनाकडे पाहण्याची दृष्टि बदलावी.  मन संतुलित ठेवणे, सहनशीलता किंवा तितिक्षा वाढविणे, प्रत्येक प्रसंगाकडे परीक्षा म्हणून पाहणे किंवा जीवनामध्ये जे काही येईल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करणे, हाच मनुष्याचा पुरुषार्थ आहे.  यामुळे सिद्ध होते की, प्रारब्ध आहे म्हणूनच साधकाला साधना करता येते.  साधकाने जीवनभर अखंडपणे आचारधर्मांचे अनुष्ठान करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रवणादि साधनेमध्ये प्रवृत्त व्हावे.  हाच खरा पुरुषार्थ आहे.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ