Tuesday, March 5, 2024

विचार आणि वासना | Thinking - Dealing With Desires

 



अंतःकरणामध्ये विकाराचा अभाव असेल तर मनामध्ये अनेक वासना प्रबल होतात.  एकामागून एक विषयकामना निर्माण होतात.  मनुष्य कामना पूर्ण करण्यासाठी त्याबरोबर वाहत जातो.  आयुष्यभर कामना पूर्ण करीत राहतो.  तेथे त्याचा विचार जागृत नाही.  मात्र विचारी मनुष्य वासना उत्पन्न झाल्यावर प्रथम विचार करेल की, ही वासना योग्य आहे की अयोग्य आहे ?  अयोग्य वासना असेल तर विचार मनुष्याला त्यापासून परावृत्त करेल.  शास्त्रश्रवणाचे संस्कार झाल्यामुळे त्यावेळी मनुष्याला शास्त्राचे स्मरण होईल.  आपण गुरुंच्याकडून काय ऐकले होते, याचे स्मरण होऊन मनुष्य शास्त्रनिषिद्ध कर्मांच्यापासून निवृत्त होईल.

 

वेद मनुष्याला अनेक विधि-निषेध देतात. मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, हे स्पष्टपणे सांगतात.  त्याच्या आधारेच मनुष्य विचार करू शकतो.  विचाराने योग्य कामना पूर्ण करणे आणि अयोग्य कामनेचा त्याग करणे हेच मनुष्याचे कर्तव्य आहे.  मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांच्यावर विचाराची मोहर लागली पाहिजे.  हेच विचाराचे कार्य आहे.

 

परंतु जेथे विचारच नसतो तेथे असंख्य वासना प्रबल होऊन वासनारूपी घनदाट अरण्य बनते.  जसे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याचे दर्शन होत नाही.  त्यावेळी अरण्यामध्ये जंगली वनस्पतींचे रान माजते.  त्याचप्रमाणे विचार नसेल तर संकटरूपी अरण्य घनदाट होते.  वाईट वासनांच्याजवळ संकटे लपून बसलेली असतात.  त्यामुळे मनुष्य त्या वासना पूर्ण करायला लागला की, त्याच्यावर संकटे कोसळतात.  म्हणून विचाररूपी धारदार शस्त्राने वासनारूपी किंवा संकटरूपी अरण्यामधील वाढलेल्या रानटी वृक्षांचा छेद केला पाहिजे.  त्यासाठी मनुष्याने विचाराने सावध-दक्ष राहिले पाहिजे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ