Tuesday, March 19, 2024

साधकाने कधीही दुःखी होऊ नये | Seeker Should Never Grieve

 



जो मनुष्य प्रामाणिकपणे शास्त्र श्रवण करतो, त्याच्याच अंतःकरणात ज्ञान उदयाला येते.  त्यावेळी हे विश्व काय आहे?  कोणाचे आहे?  कोठून निर्माण झाले?  उत्पत्ति व नाश कोणाचा होतो?  वर्धन कोण पावते?  याप्रकारच्या सर्व शंकांचा निरास होतो.

 

हे सर्व प्रश्न आत्म्याव्यतिरिक्त असणाऱ्या अनात्म्याविषयी आहेत.  वस्तुतः या प्रश्नांच्यामध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत.  प्रश्नांच्यामधून त्या प्रश्नांचाच निरास केला आहे.  विश्वाबद्दल प्रश्न विचारणे म्हणजे विश्वाचा निरास करण्यासारखे आहे.  कारण जे दृश्य आहे, त्याबद्दलच प्रश्न विचारता येतात आणि जे दृश्य आहे ते तर नियमाप्रमाणे नश्वर आहे.  यद् दृश्यं तत् नष्टं इति |  म्हणून ज्याबद्दल प्रश्न विचारले जातात, ते विश्वच मुळी दृश्य व नश्वर असल्यामुळे स्वप्नवत् अतिशय मिथ्या आहे.  परंतु मिथ्या असूनही जर आपल्या सर्वांना विश्व अनुभवायला येत असेल, डोळ्यांना दिसत असेल तर आपोआपच सिद्ध होते की, या भासमान विश्वाच्या मागे असणारे अधिष्ठान - परब्रह्मतत्त्व हेच एकमात्र सत्य आहे.  कारण अधिष्ठानाशिवाय भासमान वास्तूचा भास होऊ शकत नाही.

 

जसे - रज्जुसर्पवत् इति |  आपल्याला अंधुक प्रकाशात दोरीच्या अधिष्ठानावर सापाचा भास होतो.  सापाचा भास होण्यासाठी दोरीची सत्ता अत्यंत आवश्यक आहे.  दोरीशिवाय सापाचा भास होऊ शकत नाही.  अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तु अनुभवायला येत नाही.  हाच सिद्धांत आहे.  दोरीवर निर्माण झालेला साप सत्य वाटतो.  मग त्या सापापासून भीति वाटते.  परंतु तो साप, भीति हे सर्वच मिथ्या व कल्पित आहेत.  तसेच, हा संसारही त्या सापाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे संसारामधून निर्माण होणारी दुःखेही मिथ्याच आहेत.  संसार हा भातुकलीच्या खेळाप्रमाणे दोन घडीचा, विकारयुक्त, नाशवान, स्वप्नवत् मिथ्या आहे.  यामध्ये अनुभवायला येणारी सर्व सुख-दुःखे, प्रसंग हेही मिथ्या आहेत.  म्हणून खरे तर शास्त्र श्रवण करणाऱ्या साधकाने कधीही दुःखी होऊ नये.

 

इतकेच नव्हे, तर साधकाने "मी संसारमुक्त झालो" असे म्हणणेही व्यर्थ आहे.  दोरीवर दिसणाऱ्या सापाला "मी मारले" असे म्हणण्यासारखे ते हास्यास्पद आहे.  जो साप उत्पन्नच झाला नाही, त्याचा नाश तरी कसा करणार!  पण दिसत असेल तर तो साप उत्पन्न कसा झाला?  तसेच, ज्या संसाराची उत्पत्तीच झाली नाही, त्या संसाराचा नाश कसा करणार?  परंतु तरी सुद्धा संसार अनुभवायला येत असेल तर तो निर्माण झाला तरी कसा?  आणि कोठून?  शास्त्राच्या साहाय्याने याचा विचार होणे आवश्यक आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ