Tuesday, February 6, 2024

विचार कसा करावा ? | How To Think ?

 



हे रामा !  ज्या वेळेस साधक गुरूंच्या मुखामधून शास्त्राचे श्रवण करतो, त्यावेळी त्याची बुद्धि शुद्ध आणि परमपवित्र होते.  मनही विकाररहित, रागद्वेषरहित होऊन सत्त्वगुणप्रधान व अंतर्मुख होते.  अशा या सात्त्विक मनाने मग साधकाने अहर्निश विचार करावा.  सर्वप्रथम विचार असेल तर तो सारासार विचार होय.  चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याचा सतत विचार आवश्यक आहे.

 

अविवेकी मनुष्य मनाच्या स्वाभाविक, स्वैर प्रवृत्तीनुसार वर्तन करतो.  त्यामुळे काही वेळेस मनुष्याच्या हातून वेदनिषिद्ध कर्मे घडतात.  मांसाहारादि भक्षण, अपेय पान तसेच हिंसादि क्रूर कर्मे यामध्ये मनुष्य प्रवृत्त होऊन अधःपतित होतो.  ही कर्मे करताना मनुष्याने विचारच केला नसल्यामुळे ती अनर्थाला कारण होतात.  मात्र विवेकी मनुष्य प्रत्येक कर्म करताना योग्यायोग्याचा, धर्माधर्माचा विचार करतो.  प्रयत्नपूर्वक वाईट कर्मांच्यापासून निवृत्त होऊन धर्मानुकूल वर्तन करतो.  तेच कर्म त्याला निश्चितपणे चांगले फळ देते.

 

तसेच साधकाने साधना करीत असताना साधनेला अनुकूल काय आणि प्रतिकूल काय, याचा विचार करणे आवश्यक आहे.  साधकाने विवेकाने कर्मजन्य असणाऱ्या सर्व भोगांना नाशवान जाणावे आणि त्यानंतर अनित्य, नाशवान असणाऱ्या ऐहिक व पारलौकिक उपभोगांच्यापासून निवृत्त व्हावे.  म्हणजे विचाराने पुत्रेच्छा-वित्तेच्छा-लोकेच्छा यांचा त्याग करावा आणि आत्मेच्छा पूर्ण करण्यामध्ये प्रवृत्त व्हावे.  हे विचाराचे लक्षण आहे.

 

याप्रमाणे मनुष्याने प्रथम आयुष्यात सारासार विचार करावा. नंतर धर्माधर्माचा विचार करावा.  त्यानंतर नित्य-अनित्य,सत्-असत्, आत्मा-अनात्मा हा विचार करावा.  यानंतर प्रमाणाचा विचार करावा.  आत्मस्वरूपाचे ज्ञान घेण्यासाठी केवळ आपली बुद्धि हे प्रमाण नाही.  तसेच प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ति, अनुपलब्धि हेही प्रमाण नसून वेदांतशास्त्र हेच एकमेव प्रमाण आहे.  जसे आपल्याला आपला चेहरा पाहावयाचा असेल तर आरसा हेच एकमेव साधन आहे.  तसेच स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेदांतशास्त्र हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.  वेदान्तो नाम उपनिषत्प्रमाणम् |  असा विचार करून साधकाने गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रवण करावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ