Tuesday, February 20, 2024

बंधन म्हणजे काय ? | What Is Bondage ?

 हे रामा !  आता प्रथम मी तुला बंधन म्हणजे काय? ते सांगणार आहे.  सर्व जीवांना जन्मल्यापासून मृत्युपर्यंत बंधनाचाच अनुभव येतो.  "मी खूप बांधलो गेलोय", असे सर्वजण म्हणतात.  परंतु हे बंधन म्हणजे काय? हे समजले तर, आपोआपच मोक्षाचेही स्वरूप समजू शकेल.  म्हणून हे रामचंद्रा! तुला आता मी प्रथम बंधनाचे स्वरूप सांगतो.

 

द्रष्ट्याला दृश्याची सत्ता दिसणे म्हणजे बंधन होय.  कारण द्रष्टा हा दृश्यामुळेच बद्ध होतो.  आणि दृश्याचा अभाव झाला की द्रष्टा मुक्त होतो.  हे अंग !  हे रामचंद्रा !  दृश्य दिसणे म्हणजेच बंधन होय.  डोळे उघडले की, द्रष्टा-दर्शन-दृश्य हा व्यवहार चालू होतो.  विश्वामध्ये द्रष्टा आणि दृश्य या दोनच वस्तु आहेत.  त्याला 'अहं - मी' आणि 'इदं - हे' असे म्हणतात.  हे सर्व दिसते ते जग म्हणजे 'दृश्य' आणि दृश्याला पाहणारा 'मी' म्हणजे 'द्रष्टा' होय.  केवळ द्रष्ट्याची सत्ता असली असती,  तर काहीच समस्या नव्हती.  किंवा केवळ दृश्य असले असते तरीही काही समस्या नव्हती.  परंतु द्रष्टा आणि दृश्य एकत्र आल्याबरोबर दर्शनादि व्यवहार प्रारंभ होतो.

 

द्रष्टा-दर्शन-दृश्य हा व्यवहार चालू होणे म्हणजे द्वैताची निर्मिती आहे.  कारण जे माझ्यापासून भिन्न आहे, तेच मी डोळ्याने पाहतो.  मनाने अनुभवतो.  माझ्यापासून दृश्य भिन्न दिसू लागले की, मग समस्या निर्माण होतात.  मी, तू, हे सर्वजण, हे विश्व असे अनेक भेद निर्माण होतात.  तेथूनच सर्व संसार प्रारंभ होतो.  म्हणून दृश्य दिसणे म्हणजे बंधन आहे आणि दृश्याचा अभाव झाला की, जीव मुक्त होतो.

 

दृश्याला सत्य मानणे म्हणजेच बंधन आहे.  कारण दृश्याला सत्य मानले की, लगेचच मनामध्ये संकल्प-कामना निर्माण होतात आणि जीव बद्ध होतो.  याउलट दृश्य डोळ्यांनी पाहूनही जर मनामध्ये कामना निर्माण होत नसतील तर त्यालाच मुक्त असे म्हणतात.  म्हणून साधकाने संकल्परहित, कामनारहित होऊन व्यवहार करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ