Tuesday, February 27, 2024

विश्वाचे पारमार्थिक स्वरूप | Spiritual Nature of The World

 



विश्व हे ब्रह्मस्वरूप आहे.  ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाला विश्व दिसणारच !  ज्ञानी पुरुषाला हे सर्व मिथ्या आहे, हे समजले परंतु तरी सुद्धा डोळ्यांना विश्वच दिसेल.  परंतु आत तो – बाधितअनुवृत्या पश्यति |  ज्ञानानंतर जर तो विश्वामध्ये राहत असेल, व्यवहार करीत असेल, तर त्याचे हे सर्व व्यवहार, कर्म बाधितअनुवृत्तीने चालतात.

 

मरुमरीचिकावत् |  म्हणजेच जसे वाळवंटामधील वाळूवर पाणी नाही, हे समजते.  पाणी मिथ्या आहे, हे बुद्धीला समजल्यानंतर डोळ्यांना पुन्हा जरी पाणी दिसले तरी बुद्धि सतत सांगते की, तेथे पाणी नाही.  त्यामुळे तो पुरुष कधीही त्या पाण्यामध्ये प्रवृत्त होत नाही.  त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला या दृश्य विश्वाचे मिथ्यात्व समजले की, तो पुन्हा कधीही त्यात प्रवृत्त होत नाही.

 

याठिकाणी विश्वाचा निरास करून त्याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचे दर्शन घेतले जाते.  म्हणून म्हणतात – आत्मा एव सत्यं अन्यत मिथ्या इति |  म्हणून अज्ञानी पुरुष अध्यास पाहतो आणि ज्ञानी पुरुष अज्ञानाचा निरास करून अध्यासाचे अधिष्ठान पाहतो.  म्हणून प्रथम विश्वाचा निरास केला पाहिजे आणि निरास करण्यासाठी प्रथम अध्यास केला पाहिजे.  अध्यारोपअपवादाभ्यां गुरुः शिष्यं उपदिशति |  विश्वाच्या दृष्टीने पाहिले तर विश्व ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले तर विश्व मिथ्या आहे.  जसे, सर्पाच्या दृष्टीने पाहिले तर सर्प रज्जूस्वरूप आहे.  परंतु रज्जूच्या दृष्टीने पाहिले तर साप नाहीच.  तो मिथ्या, भासमान आहे.  याला म्हणतात – अन्वय आणि व्यतिरेक.

 

भाष्यकार शेवटी सिद्धान्त मांडतात – फक्त आत्मा हा एकच सत्य आहे.  जे दिसते ते सर्व विश्व मिथ्या, मनोकल्पित, भासात्मक आहे.  म्हणून आचार्य म्हणतात –  

श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटीभिः |

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ||       (शांकरभाष्य)

आचार्य सांगतात की, या अर्ध्या श्लोकामध्ये मी संपूर्ण शास्त्राचे सार सांगतो.  ब्रह्म हे सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त अन्य सर्व मिथ्या आहे आणि जीव हा स्वतःच पारमार्थिक स्वरूपाने परब्रह्मस्वरूप आहे.  हाच संपूर्ण वेदांचा, श्रुतींचा निर्णय, सार, निश्चित असा अर्थ आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ