आस्तिक्य बुद्धीतून निर्माण झालेल्या श्रद्धेमधून
प्रेम किंवा भक्ति निर्माण होते. प्रेमामुळे
ईश्वराचे अधिक ज्ञान होते. ईश्वराचे स्वरूप,
कल्याणगुण, माहात्म्य समजते. ईश्वराचे कर्तुम्-अकर्तुम्
स्वरूप हे जितके समजते तितक्या प्रमाणात स्वतःचा अहंकार, दर्प कमी होतो. भक्त अधिक नम्र, विनयशील होतो. प्रेमाचा अधिक उत्कर्ष होतो. त्यामुळे ज्ञान अधिक वृद्धिंगत होते. म्हणजेच ज्ञान आणि भक्ति एकाच वेळेला वर्धन होतात.
ते दोन्हीही पूरक आहेत. तुल्य आहेत. म्हणून काही आचार्य म्हणतात ज्ञान आणि भक्ति परस्पर
आश्रित आहेत. श्रवणामधून भक्ति निर्माण
होते.
भक्तिशिवाय ज्ञान असेल तर ते ज्ञान
मनुष्यामध्ये अहंकार, दंभ, दर्प वाढविते. मनुष्य
स्वतःला फार मोठा विद्वान समजतो आणि अन्य सर्व कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो. त्याच्या मनाला ज्ञानाचे फळ, शांति, तृप्ति मिळत
नाही. उलट ते ज्ञान दुःखाला,
द्वंद्वाला कारण होते. म्हणून श्रद्धेशिवाय
ज्ञानाला पूर्णता येत नाही. पक्वता येत नाही.
तसेच प्रेम किंवा भक्ति ज्ञानरहित असेल तर
ते प्रेम फक्त भावनांचा उद्रेक होईल. ती फक्त
उचंबळून येणारी एक उर्मी असेल. भक्तीला
विवेकाची बैठक नसल्यामुळे समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे त्या प्रेमाला भरती येऊन एका
क्षणाला परमोच्च अवस्थेला नेईल आणि दुसऱ्या क्षणी ओहोटीमुळे प्रेम विरून जाईल. त्यामुळे याप्रकारचे प्रेम सातत्याने टिकत नाही.
म्हणून भक्तीला विवेकाची साथ आवश्यक आहे.
विवेकयुक्त भक्तिच पक्व होऊन परमप्रेमस्वरूपावस्थेला
प्राप्त होते. यासाठी सर्व संत डोळस भक्ति
असावी असे म्हणतात. थोडक्यात ज्ञानाला
भक्तीची आणि भक्तीला ज्ञानाची सांगड हवी. त्याशिवाय
साध्य प्राप्त होणार नाही.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –