संसारग्रस्त मनुष्याला सतत दुःखांचाच अनुभव येत
असल्यामुळे त्याच्या मनामध्ये आनंदस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होईल.
खरोखरच ते परमपद आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून येथे वसिष्ठ मुनि सांगतात की, ज्याच्या
मनामध्ये तत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे, त्याने त्यामध्ये प्रयत्नपूर्वक विचार
करावा. तत्त्व किंवा आत्मस्वरूप नाहीच, असे
म्हणणे अत्यंत घातक असून त्यामुळे स्वतःचेच अस्तित्व नाकारण्यासारखे आहे.
श्रुति म्हणते - असन्नेव स भवति असद् ब्रह्मेति
चेत् वेद | (तैत्ति. उप.) जो ब्रह्मस्वरूपाला असत् म्हणजे नाही असे म्हणतो, तो स्वतःच असत् होतो. म्हणजे तो स्वतःच स्वतःचे अस्तित्व अमान्य करतो.
कारण तत्त्व हे स्वतःचे पारमार्थिक स्वरूप
आहे. तसेच तत्त्वाचे अस्तित्व नाकारण्यासाठी
सुद्धा माझ्या - तत्त्वाच्या सत्तेची आवश्यकता आहे. म्हणूनच सत्तेचा - अस्तित्वाचा म्हणजे सत् तत्त्वाचा
कोणीही निरास करू शकत नाही. वसिष्ठ मुनि सांगतात
की, नास्तिक मनुष्याने याप्रमाणे तत्त्वामध्ये विचार करावा.
याशिवाय असणारे जे आस्तिक लोक आहेत म्हणजे आत्मचैतन्यस्वरूपाच्या,
ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांचा विश्वास आहे, जे बुद्धीने तत्त्वाचे अस्तित्व जाणतात,
अशा श्रद्धावान विवेकी साधकांनी त्यापुढे साधना करून, तत्त्वाचे विशेष ज्ञान प्राप्त
करून या भवसागरमधून पार व्हावे. कारण श्रद्धा
हेच ज्ञानाचे साधन आहे. याप्रमाणे दृढ श्रद्धा
निर्माण झाल्यानंतरच तत्त्वाचे ज्ञान होऊन त्यामध्ये निष्ठा प्राप्त होते आणि साधक
क्रमाने या अज्ञानकल्पित संसारामधून मुक्त होतो.
जो जेथे ज्या पायरीवर आहे, तेथून त्याने क्रमाने
आपल्या जीवनाचा विकास करावा. हाच उद्देश आहे.
नास्तिक लोकांनी, केवळ दिसत नाही म्हणून
ईश्वर नाही, आत्मचैतन्य नाही, असे म्हणण्यापेक्षा बुद्धीने थोडा सखोल विचार करावा.
कारण विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की,
ज्या आपल्याला दिसत नाहीत, तरीही त्या अस्तित्वामध्ये आहेत. म्हणून नास्तिक बुद्धिवादी लोकांनी ईश्वराचे अस्तित्व
नाकारण्यापेक्षा त्यामध्ये विचार करावा आणि आस्तिक श्रद्धावान लोकांनी गुरुमुखामधून
वेदांतशास्त्राचे श्रवण करावे. त्यानंतर त्यापुढील
मननादि साधनेमध्ये प्रवृत्त होऊन ज्ञान, ज्ञाननिष्ठा व तत्त्वाची साक्षात् अनुभूति
प्राप्त करावी.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–