प्रत्येक जीवाचे खरे स्वरूप परमात्मस्वरूपच
आहे. परमात्मा दूर नसून आपले स्वतःचे
स्वरूपच आहे. परंतु मानवी शरीरामध्ये
असलेले हे परमात्मस्वरूप मूढ, अविवेकी लोक अज्ञानाच्या आवरणामुळे जाणत नाहीत. अहं शब्दाच्या लक्ष्यार्थाने निर्देशित केलेले
माझे निरतिशय आनंद स्वरूप अज्ञानी लोक जाणत नाहीत. याचे कारण अज्ञानाच्या आवरणामुळे बुद्धि
भ्रमिष्ट होऊन अहंकाराच्या उन्मादामुळे त्यांना सद्गुरूंचा संग मिळत नाही. त्यामुळे गुरुमुखामधून शास्त्राचे श्रवण
करण्याची संधी त्यांना मिळत नाही. त्यामुळे
ते अज्ञानी लोक स्वबुद्धीला प्रमाण मानत असल्यामुळे ते प्रत्यक्ष, इंद्रियगोचर आहे
त्यालाच सत्यत्व देतात.
शरीर, इंद्रियांच्या अतीत असलेले तसेच मन
आणि बुद्धीच्याही अतीत असलेले स्वतःचे स्वरूप जाणत नाही. इतकेच नव्हे तर, त्यांच्या हृदयामध्ये असलेले
माझे अस्तित्व सुद्धा मान्य करीत नाहीत. हाच
माझा अनादर आहे, तिरस्कार आहे. याच अज्ञानामुळे देहादि सर्व अनात्म्याचे धर्म
माझ्यावर आरोपित करून जो “मी नाही” तो “मी आहे” असे म्हणतात. अमानवी असणाऱ्या मला मानव म्हणून पाहतात. जन्ममृत्युरहित असून सुद्धा जन्ममृत्यूने
मर्यादित करतात. “मी कर्ता”, “मी भोक्ता”
असे समजतात. “मी लहान आहे”, “मी मोठा आहे”,
“मी अज्ञानी आहे”, “मी पापी आहे”, “मी बहिरा आहे”, मी आंधळा आहे”, “मी लंगडा आहे”,
“मी म्हातारा आहे”, “मी मेलो” याप्रमाणे विपरीत भाव निर्माण करतात.
मानवी शरीराचा आश्रय घेऊन मी अवतार घेत
असल्यामुळे अज्ञानी जीव फक्त माझे मानवी शरीरच पाहतात. त्यापलीकडे असलेले जन्ममृत्युरहित, नित्य,
कूटस्थ, असंग, निरुपाधिक सच्चिदानंद स्वरूप जाणत नाहीत. ते शरीरालाच सत्यत्व देत असल्यामुळे माझ्या सगुण
रुपालाच महत्व देतात. मी शरीराने अन्य
जीवांच्यासारखा असल्यामुळे त्यांच्यामधीलच मी एक आहे असे मानतात. त्यामुळे माझे – परमेश्वराचे स्वरूप न जाणता एक
मानव आहे असेच म्हणतात. मला मानवी शरीराने
मर्यादित करतात. यामुळे त्या अवतारामधील
ईश्वरत्व न पाहाता मनुष्यत्व पाहिले जाते. मनुष्यत्व पाहिले की तेथे रागद्वेष आपोआपच
निर्माण होतात. सर्व मानवी मर्यादा येतात.
यामुळे अवतारामध्ये परमेश्वराला किंवा
अवतारी पुरुषाला सुद्धा आपण कमी लेखतो. त्याची
अवहेलना, निंदा करतो. तिरस्कार करतो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–