Tuesday, September 12, 2023

मौन साधना | The Practice of Silence

 



शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी असणारी मौनसाधना सांगितली जाते.  भगवान श्रीरमणमहर्षींनी वर्षानुवर्षे मौन साधना केली, आत्मपरीक्षण केले.  जीवनभर साधकांना मौनाचाच उपदेश केला.  मौन याचा अर्थ केवळ न बोलणे नव्हे.  कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकारचे मौन आहे.  व्यवहारामध्ये आपण खरोखरच जे बोलायला पाहिजे, ते कधीच बोलत नाही आणि जे कधीही बोलायला नको, तेच बोलतो.  साधकाचे आणखी एक महत्वाचे ब्रीद आहे आणि ते म्हणजे जीवनामध्ये कोणावरही comments करू नयेत.  दुसऱ्याचे चारित्र्यहनन करू नये.

 

भगवान वाचिक तपस् सांगतात – अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |       (गीता अ. १७-२५)

साधकाने दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक वचन बोलावे.  जे जे आपण अध्ययन करतो, जे जे मी श्रवण करतो, त्यावरच बोलावे.  व्यवहारामध्ये आपण अन्य विषय, व्यक्ति, प्रसंग, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार याबद्दलच अधिक बोलतो.  व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांशी जितके बोलाल, एकमेकांच्या जवळ याल, दुर्दैवाने बोलता-बोलता एकमेकांच्यामधील राग आणि द्वेष उफाळून बाहेर पडतात.  मनुष्य विकारांच्या आहारी जातो.  साधकाचे मन विक्षिप्त, कलुषित होते.

 

तसेच, साधकाच्या दृष्टीने पाहिले तर या सर्व चर्चांचा, त्याला साधनेमध्ये काहीही उपयोग होत नाही.  उलट प्रतिबंधच होतो.  म्हणजे त्याचे मन अधिकाधिक बहिर्मुख, विषयाभिमुख होते.  म्हणूनच श्रुतीने याठिकाणी साधना सांगितलेली आहे की – अन्या वाचा विमुञ्चथ |  हे शिष्या !  तू अन्य वाचेचा त्याग कर आणि मौनाचा अभ्यास कर.  जितके कमी बोलता येईल, तितके कमी बोलावे.  हा अभ्यास करावा.  असा मौनाचा जर अभ्यास केला, तर मन शांत, अंतर्मुख होऊन तेच मन या साधनेसाठी योग्य, अनुकूल आणि अधिकारी होऊ शकते.  अन्य लोक, विश्व, व्यक्ति, प्रसंग याविषयी बोलण्यापेक्षा साधकाने आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ