नरकामध्ये गेल्यानंतर अनेक भयंकर भोग भोगावे
लागतात. दगड खाणे, तलवारीने कापले जाणे, सर्व बाजूंनी दगडांचा वर्षाव होणे, अग्नीमध्ये होरपळून निघणे, अंगावर बर्फाचा वर्षाव होणे, कुऱ्हाडी, करवती, सुरा, चाकू यांसारख्या धारदार
शस्त्रांनी शरीराचे तुकडे होणे, चंदनाच्या
खोडाप्रमाणे मोठ्या खडकावर वेगाने आदळणे, घूण नावाचे कीटक किंवा वाळवी लाकडाला जशी पोखरून
काढते, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या किड्यांनी शरीर पोखरले जाणे, उकळत्या तेलाच्या कढईत पडणे,
मोठमोठ्या दोरखंडाने बांधले जाणे, अग्नीचा वर्षाव करणाऱ्या बाणांनी शरीरावर प्रहार
होणे, भर उन्हात तापलेल्या जमिनीवर अनवाणी
पायाने चालणे, शिशिर ऋतूमधील कडाक्याच्या थंडीमध्ये
अंगावर हिमवृष्टि होणे, डोक्यावर सातत्याने
शस्त्रांचे आघात होणे, कधीच सुखाची झोप न येणे, तोंड बांधले जाऊन जीव गुदमरणे, उलटे टांगले जाणे,
या व अशा अनेक प्रकारच्या शिक्षा नरकामध्ये
भोगायला लागतात.
यथा कर्म तथा श्रुतम् | (कठ. उप.)
"जसे कर्म तसे फळ", या न्यायाने मनुष्याला
आपल्या वाईट कर्मांची फळे भोगावीच लागतात. किंबहुना येथे, या विश्वात आपण एखादे वाईट कर्म
केले, तर त्याचे शेकडो पटीने अधिक वाईट फळ नरकलोकामध्ये भोगावे लागते. म्हणून मनुष्याने निदान हे भयंकर वर्णन समजल्यानंतर
तरी यामध्ये विचार करावा. आपणंच आपल्या स्वतःच्या
जीवनाची प्रतारणा करू नये. हे दुर्लभ असणारे
मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर केवळ वाईट कर्मांसाठी व भोगण्यासाठी याचा उपयोग न करता
याचा उपयोग साधनेसाठी करावा. त्यासाठीच शास्त्रविचार
होणे अत्यंत आवश्यक आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–