Monday, July 10, 2023

ज्ञानाची सम्यक् दृष्टि - विनोद दृष्टिकोन | Elaborate Vision - Joke Perspective

 



वसिष्ठ मुनि येथे दृष्टांत देतात की, सापाची त्वचा ज्यावेळेस जुनी होते, त्यावेळेस तो प्रयत्नाने जुनी त्वचा त्याग करतो.  त्याचप्रमाणे विवेकी पुरुष सकल आधिपंजराचा म्हणजे सर्व मानसिक दुःखांचा त्याग करतो.  मानसिक व्याधीवर 'विचार' हाच एकमात्र उपाय आहे.  हा विचार शास्त्राधारे करावा.

 

जितके आपण मनामधील विचारांना सत्यत्व व महत्त्व देतो तितकी ती दुःखे वाढतच जातात.  म्हणून साधकाने मनामधील दुःखांच्यामध्ये विचार करावा.  दुःखांचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करावा.  आपण दुःखांचे मूळ शोधायला जाऊ त्यावेळी समजते की, अरे ज्याला मी दुःख असे म्हणत होतो, ते दुःख अस्तित्वामध्येच नाही.  दुःख हे प्रत्यक्ष डोळ्यांनाही दिसत नाही.  त्यामुळे वस्तुतः दुःखाला सत्ता नसून आपण दुःखाची फक्त एक कल्पना केली आहे.  त्यामुळे त्या कल्पनेचा शोध घ्यायला गेले की, आपोआपच दुःख नाहीसे होते.

 

जसे एकदा विनोद घडला की, आपण विनोद ऐकताच हसतो.  अतिशय सहजतेने सोडूनही देतो.  विनोदामध्ये कोणतीच समस्या येत नाही.  तसेच 'विनोद' या भावनेने पाहिल्यावर आपण त्या प्रसंगामध्ये एकदम तणावरहित होतो.  तसेच ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हा संसार म्हणजेच एक मोठा विनोद आहे.  त्यामुळे येथे काहीही घडले तरी ज्ञानी पुरुष फारसे मनावर घेत नाही.  प्रसंग येतात तसे निघूनही जातात.  त्यामुळे तो कोणत्याच प्रसंगाला सत्यत्व किंवा अतिमहत्त्व देत नाही.  म्हणून ज्ञानी पुरुष अज्ञानी माणसांच्याबरोबर या विश्वामध्ये राहून सर्व अनुभवून विनोदाप्रमाणे मनाने सर्व सोडूनही देतो.  सर्व व्यवहारापासून तो अलिप्त, अस्पर्शित व अपरिणामी राहतो.  हीच ज्ञानाची सम्यक् दृष्टि आहे.

 

याउलट अज्ञानी पुरुषाला मात्र सर्वत्र दुःखाचीच अनुभूति येते.  त्याला सर्व जग दुःखमय दिसते.  विश्व, विषय, माणसे, प्रसंग या सर्व ठिकाणी त्याला दुःखाचा अनुभव येतो.  याचे कारण हा अविवेकी मूढ, मनुष्य संसाराला, सर्व प्रसंगांना सत्यत्व देतो.  त्यामुळे ममत्वाने सर्वांच्यामध्ये बद्ध होऊन तो शोकमोहाने युक्त होतो.  म्हणून अज्ञानी पुरुषाला सर्व जग दुःखमय दिसते, तर ज्ञानी पुरुषाला सर्व जग आनंदमय दिसते.  हाच ज्ञान व अज्ञान यामधील फरक आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ