अव्यक्तापासून स्थूलापर्यंत, नानात्व
अनेकत्वाने युक्त, व्यष्टिसमष्ट्यात्मक असलेले हे विश्व कोठे आहे ? तर
भगवंतांनी ‘मत्स्थानि’ हा शब्द येथे वापरलेला आहे. स्वप्न ज्याप्रमाणे आपल्या बाहेर
आहे असे वाटत असेल तरी ते आपल्या आतच असते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व आपल्याबाहेर
आहे असे अनुभवाला येत असेल तरी माझ्यामध्ये म्हणजेच प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या
परमात्म्यामध्ये – चैतन्यस्वरूपामध्येच आहे.
सर्व विश्व परमात्म्यामध्ये आहे असे म्हणणे
म्हणजे या आत्मचैतन्यामध्येच आहे असे जाणणे होय. ‘मी’च या विश्वाचे अधिष्ठान
आहे. आत्मचैतन्यामध्येच
सर्व विश्वाची स्थिति आहे. सर्व क्रिया, व्यवहार,
अनुभव, प्रचीति इतकेच नव्हे तर, सुखदुःखाचे अनुभव, सर्व सात्त्विक, राजसिक आणि तामसिक विकार आत्मचैतन्यामध्येच आहेत. म्हणजेच मनाने निर्माण केलेले अंतर्विश्व आणि प्रचीतीला येणारे बहिर्विश्व हे
आत्मचैतन्यामध्येच आहेत. आकाश ज्याप्रमाणे वायूच्या
कोणत्याही व्यापाराने किंवा विकाराने स्पर्शित होत नाही, विकारी होत नाही, तर ते
आकाश नित्य, असंग, अलिप्त, अविकारी राहाते. त्याच्यामध्ये कोणत्याही
प्रकारची क्रिया होत नाही. त्याचप्रमाणे आत्मचैतन्यामध्येच
सर्व विश्व स्थित असल्यामुळे ते विश्वाचा आधार आहे. त्याच्यामध्ये विश्वाचा
सर्व व्यापार चालतो; परंतु आत्मचैतन्य मात्र शाश्वत, अचल, असंग, साक्षीरूपाने
राहाते.
रथाचे चाक आऱ्यामधून रथाच्या नाभीमध्ये
किंवा आसामध्ये जोडलेले असते. त्यामुळे रथाची नाभीच आऱ्यांना
आणि चाकाला सत्ता, सामर्थ्य आणि शक्ति देते. नाभीभोवतीच रथचक्र
अखंड फिरत असते. परंतु रथनाभी मात्र स्थाणूप्रमाणे स्थिर, अचल राहाते. स्वतः
अचल राहून आपल्याभोवती सर्व फिरवते. त्याचप्रमाणे विश्वचक्राचा
केंद्रबिंदू प्रत्यगात्मस्वरूप असलेले आत्मचैतन्य हेच आहे. म्हणून भगवान म्हणतात की, अर्जुना ! मी सर्व विश्वाला अंतर्बाह्य
व्याप्त असूनही – सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः | मी
सर्वांच्या हृदयामध्ये कूटस्थ-असंग-चिद्रूप-साक्षीचैतन्य-स्वरूपाने निवास करतो. म्हणून
सर्व विश्वाचा केंद्रबिंदू ‘मी’ आत्मचैतन्य आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–