विचाराने या दुःखांचा परिहार होऊ
शकतो. विचाराने दुःखांचा प्रभाव कमी करता येतो. जे घडणार ते कधीही टाळता येत नाही, या विचाराने प्रसंगाला
सामोरे जाण्याची मनाची तयारी होते. मग ती गोष्ट मान्य करणे खूप सोपे जाते. त्या दुःखाचा मनावर तितकासा परिणाम होत नाही. म्हणूनच वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, विचाराने
सकल दुःखांचा क्षय अवश्य होतो. त्यामुळे विचारदृष्टींचा
कधीही अवमान करू नये. साधकाने विचारमार्गाची
म्हणजे ज्ञानमार्गाची अवहेलना करू नये.
सामान्यतेने सर्व साधक अध्यात्ममार्गामध्ये
स्वतःच कल्पना करून साधनांच्यामध्ये भेद करतात. भक्तिमार्ग वेगळा, ज्ञानमार्ग वेगळा, कर्म, योग,
ध्यान या सर्व मार्गांना भिन्न स्वरूपाने पाहतात. स्वतःला ज्ञानमार्गी समजणारे लोक भक्तीला कमी लेखतात.
याउलट स्वतःला भक्तिमार्गी समजणारे लोक ज्ञान,
कर्म, योग, ध्यान या सगळ्यालाच कमी लेखतात. स्वतःला योगमार्गी समजणारे लोक योगाव्यतिरिक्त सगळी
साधने निष्फळ समजतात. याप्रमाणे प्रत्येकजण
माझाच मार्ग खरा, असे गृहीत धरून संकुचित वृत्तीने साधना करतात.
परंतु वस्तुतः हे सर्व मार्ग साहाय्यकारी
व परस्परपूरक आहेत. ज्या साधकाचे जसे मन असेल,
जसा स्वभाव प्रकृति असेल, त्या त्या प्रमाणे तो साधक योग्य त्या मार्गामध्ये प्रवृत्त
होऊ शकतो. मात्र तरीही आपण मार्ग भिन्न करू
शकत नाही. कारण ज्ञानामध्येही भाव, भक्ति
पाहिजे. ज्ञानमार्गी साधकालाही कर्म करावे
लागते. भक्तिमार्गी साधकालाही प्रथम आपल्या
आराध्याचे ज्ञान व्हावे लागते. भक्तिशिवाय
ज्ञानाला अर्थ नाही आणि ज्ञानाच्या दृष्टिशिवाय केवळ भावालाही अर्थ नाही.
याचा सारांश पाहिला की एवढे मात्र निश्चित होते
की, ज्ञान-भक्ति-कर्म-ध्यान-योग असो, कोणताही मार्ग असेल तरी त्यामध्ये विचार म्हणजे
विवेक हा आवश्यक आहेच. त्यामुळे कोणत्याही
मार्गाची कोणीही अवहेलना करू नये. तसेच विचारमार्गाची तर करूच नये. कारण विवेकाशिवाय ज्ञान मिळत नाही. विवेकाशिवाय
कोणाची भक्ति करायची हे समजत नाही. विवेकाशिवाय
कोणते कर्म करावे, हेही समजत नाही. विवेकाने
मन नियंत्रित केल्याशिवाय योगसाधनाही करता येत नाही. म्हणून वसिष्ठमुनि येथे पुन्हा एकदा सिद्ध करतात
की, विचारमार्ग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–