Tuesday, June 6, 2023

अंतरस्थित परंतु अलिप्त | Contained But Untouched

 



नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त, प्रत्यगात्मस्वरूप आत्म्याने आकाशापासून पृथ्वीपर्यंत पंचमहाभूत आणि त्यांच्या कार्यासहित पंचभौतिक विषय व सर्व प्रकारची शरीरे निर्माण करून स्वतःच्या सत्तेने आणि चैतन्यस्वरूपाने सत्ता देतो.  त्यांना चेतना देतो.  त्यामुळे सर्व शरीर चेतनयुक्त होऊन जिवंत आहे असे भासतात.  त्या आरोपित झालेल्या सर्व जीवांना परमात्मा धारण करून पोषण करतो.  भगवंतांची मायाशक्ति सर्वांच्या बुद्धीवर आवरण घालून मोह निर्माण करते.  बुद्धि भ्रष्ट करते.  मनुष्याला विवेकशून्य करते.  यामधूनच संसाराचे चक्र सुरु होते.

 

अहंकार स्वतःच्याच कर्माने अनेक प्रकारच्या विषयवासना संग्रहीत करून वासनांचा गुलाम होतो.  तो अगतिक होतो.  आणि याच वासना पुनरपि जननं पुनरपि मरणं |  याप्रमाणे जन्ममृत्यूरूपी संसाराला कारण होतात.  जीव कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये संपूर्ण अडकले.  हेच संसाराचे वर्धन आणि पोषण होय.  परंतु मनुष्य मात्र आपल्या सर्व दोषांचे खापर परमेश्वरावर फोडून म्हणतो की तूच कर्ता आहेस.  तूच मला बुद्धि दिलीस वगैरे वगैरे.  असे झाले तर सर्व दोष भगवंतावर येतील.  तो दोषी ठरेल.  म्हणून याचे खंडन करण्यासाठी भगवान स्वतःच म्हणतात – नतु भूतस्थः इत्युच्यते |  भूतमात्रांना मर्यादा आहेत.  त्यांच्यामध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व असून सुख-दुःखांचा संसार आहे.  परंतु ‘मी’ ला मात्र कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.  कर्तृत्व-भोक्तृत्व, सुख-दुःख सुद्धा स्पर्श करू शकत नाही.  त्यामुळे ‘मी’ कर्म-कर्मफलांनी कधीही बद्ध होत नाही.

 

ज्याप्रमाणे आकाश घटामध्ये राहूनही घटाशी कधीही तादात्म्य पावत नाही.  त्यामुळेच ते घटाच्या गुणधर्म, विकारांनी लिप्त होत नाही.  स्पर्शित होत नाही.  इतकेच नव्हे तर परिणामी सुद्धा होत नाही.  त्याचप्रमाणे मी सर्व भूतमात्रांच्यामध्ये राहूनही सोपाधिक गुणधर्मविकारांनी स्पर्शित, परिणामी होत नाही.  ‘मी’ कर्ता भोक्ता, सुखी-दुःखी होत नाही, कारण सर्व भूतमात्र कल्पित आहेत.  कल्पित वस्तूच्या गुणधर्मांनी अधिष्ठान कधीही लिप्त होत नाही.  म्हणून मी नित्य, असंग, कूटस्थ आणि साक्षीचैतन्यस्वरूप आहे.  थोडक्यात मी त्यांच्यामध्ये असूनही अलिप्त आहे.  मी नित्य, निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ