हे रामा ! शम, विचार, संतोष आणि सत्संग हे चार मोक्षद्वाराचे
द्वारपाल असल्यामुळे साधकाने या चार साधनांचे अनुसरण करावे. चार जमले नाहीत तर तीन साधने अनुसरण करावीत. तीन नाही जमले तर दोन साधनांचे अनुसरण करावे. त्यामुळे राजमंदिराप्रमाणेच ही साधने म्हणजे हे
द्वारपाल मोक्षरूपी राजगृहाचा दरवाजा आपल्यासाठी उघडून देतात. हे जमले नाही तर निदान या चारपैकी एका साधनाचे तरी
मनापासून अनुसरण करावे. प्राणपणाने साधना करावी.
कारण यांपैकी एक साधन आत्मसात झाले तरी आपोआपच
चारही साधने आपल्याला वश होतात.
वसिष्ठ मुनि येथे मोक्षागृहामध्ये प्रवेश कसा
करावा, हे आपल्याला सांगतात. जसे कोणत्याही
घराला किंवा राजमंदिराला दरवाजा असतो. दरवाजामधील
द्वारपाल अनुकूल झाले तरच आपल्याला आत प्रवेश करता येतो. तसेच जणू काही मोक्षरूपी हे राजमंदिर आहे. त्यामुळे त्यामध्ये प्रवेश करावयाचा असेल तर द्वारपालांची
अनुकूलता आवश्यक आहे.
मोक्षागृहाच्या दाराशी शम, संतोष,
विचार आणि सत्संग असे चार द्वारपाल आहेत. साधकाने
हे चारही गुण प्राप्त करावेत. ते नाही जमले तर त्यांपैकी निदान तीन किंवा दोन गुण
तरी आत्मसात करावेत. तेही जमले नाही तर यांपैकी
एका गुणाचा तरी पूर्ण आश्रय घ्यावा. या चारपैकी
कोणताही एक गुण जरी आत्मसात झाला तरी साधकाला चारही गुण वश होतात.
म्हणजेच जेथे शम आहे तेथे आपोआपच विचार, संतोष
व सत्संगाची प्राप्ति होते. जेथे विवेक असेल
तेथेच मन शांत व तृप्त होऊन सत्संग प्राप्त होतो. जेथे तृप्ती आहे तेथेच मन शांत व विवेकशील बनून ते
मन सत्संगामध्ये रममाण होते आणि सत्संगामध्ये मन शांत, विवेकशील व तृप्त होते. म्हणून साधकाने यांपैकी एक तरी गुण प्रयत्नपूर्वक
आत्मसात करावा.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–